
टीम इंडियाचा युवा आणि सलामीवर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. यशस्वीने 51 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर 2 धावा घेत शेकडा पूर्ण केला. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखलीतील मायदेशातील पहिलं शतक ठरलं. यशस्वीने या शतकासह टीम इंडियाच्या तिघांना मागे टाकलं. यशस्वीने माजी फलंदाज आर अश्विन, महेंद्रसिंह धोनी याच्यासह स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांचा 6 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला.
यशस्वी आणि केएल राहुल या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर केएल आऊट होताच ही जोडी फुटली. या जोडीने 17.3 ओव्हरमध्ये 58 धावा जोडल्या. यशस्वीने केएलनंतर साई सुदर्शन याच्यासह भागीदारी केली आणि भारताच्या डावाला गती दिली. यशस्वीने साईसह एकेरी-दुहेरी धावा जोडत अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने 10 चौकारांसह 82 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर यशस्वीने पुढील 50 धावांसाठी 63 चेंडूंचा सामना केला. यशस्वीने अशाप्रकारे 145 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. यशस्वीने 69.66 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. यशस्वीने या शतकी खेळीतील 101 पैकी 64 धावा या एका जागेवर उभे राहत केल्या. यशस्वीने 16 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.
यशस्वीने या शतकासह जडेजा, धोनी आणि अश्विन या तिघांना मागे टाकलं. धोनी आणि अश्विन या दोघांनी कसोटी कारकीर्दीत प्रत्येकी 6-6 शतकं झळकावली होती. यशस्वीने या दोघांना मागे टाकलं. तर जडेजाने विंडीज विरुद्ध पहिल्याच कसोटीत शतक करत यशस्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. मात्र आता यशस्वीने जडेजालाही मागे टाकलं. यशस्वीने 48 व्या डावात हे सातवं शतक पूर्ण केलं.
यशस्वीने या शतकी खेळी दरम्यान आणखी एक विक्रम केला. यशस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने 71 डावांमध्ये 3 हजार धावांचा टप्पा गाठला. तर वेगवान 3 हजार धावांचा विक्रम हा माजी दिग्गज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 69 डावांत 3 हजार धावा केल्या होत्या.
दरम्यान यशस्वी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणारा दुसरा भारतीय फंलदाज ठरला आहे. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक 9 शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांच्या नावावर आहे. त्यानंतर आता ऋषभ पंत आणि केएल राहुल (प्रत्येकी 6-6 शतकं) या दोघांना पछाडत या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.