Asia Cup 2025 आधी मोठा झटका, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू टी 20i सीरिजमधून बाहेर

T20i Cricket : श्रीलंका क्रिकेट टीम आशिया कपआधी झिंबाब्वे विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेच्या स्टार ऑलराउंडरला दुखापतीमुळे झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे.

Asia Cup 2025 आधी मोठा झटका, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू टी 20i सीरिजमधून बाहेर
Arshdeep Singh and Waninndu Hasaranga
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 4:27 PM

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आशिया कप 2025 आधी झिंबाव्बे दौऱ्यावर आहे. श्रीलंका यजमान झिंबाब्वे विरुद्ध एकूण 2 मालिकांमध्ये 5 सामने खेळणार आहे. श्रीलंकेच्या झिंबाब्वे दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टी 20i मालिकेसाठी गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी टीम जाहीर केली. श्रीलंका क्रिकेट या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी आशिया कपआधी हा मोठा झटका समजला जात आहे.

कोण आहे तो खेळाडू?

निवड समितीने टी 20i मालिकेसाठी श्रीलंका संघात 17 खेळाडूंना संधी दिली आहे. श्रीलंकेचा स्टार ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याला संधी मिळालेली नाही. वानिंदुची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे वानिंदु आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत खेळणार की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वानिंदूला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे वानिंदुला या दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. हसरंगा जुलैपासून एकही सामना खेळलेला नाही. मात्र संघात दुनिथ वेललागे आणि महीश तीक्षणा 2 फिरकीपटू आहेत. त्यामुळे श्रीलंकेला हसरंगाची उणीव जाणवणार की नाही? हे या मालिकेदरम्यानच स्पष्ट होईल.

श्रीलंकेचा 2008 नंतर झिंबाब्वे दौरा

श्रीलंका 17 वर्षांनंतर पहिल्यांदा झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका याआधी 2008 साली अखेरीस झिंबाब्वे दौऱ्यावर गेली होती. तेव्हा श्रीलंकेने झिंबाब्वेचा एकदिवसीय मालिकेत 5-0 ने धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता दोन्ही संघ एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही मालिकेतील पाचही सामने हरारे स्पोर्ट्स कल्बमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

आशिया कप 2025 आणि श्रीलंका

श्रीलंकेच्या झिंबाब्वे दौऱ्याची सांगता 7 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर श्रीलंका थेट दुबईत पोहचणार आहे. आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेचं 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबीमधील क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे.

श्रीलंकेचा आशिया कप मोहिमेतील पहिला सामना 13 सप्टेंबरला होणार आहे. श्रीलंकेसमोर पहिल्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरला श्रीलंका हाँगकाँग विरुद्ध भिडणार आहे. तर श्रीलंका साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना 18 सप्टेंबरला होणार आहे.