Womens World Cup 2025 Final : कोणाचं ऐकून हरमनप्रीत कौरने शेफाली वर्माकडे सोपवला चेंडू? आणि तिथेच पलटला खेळ
Womens World Cup 2025 Final : पहिल्यांदा महिला वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर खूप भावूक दिसली. मॅच नंतर टीमच्या फ्यूचरबद्दल तिने काही मोठ्या गोष्टी सांगितल्या.

Womens World Cup 2025 Final : भारतीय महिला क्रिकेट टीमने नवीन गौरवशाली अध्याय लिहिला आहे. अनेक वर्षांपासूनच अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण केलय. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडिअमवर भारतीय महिला टीमने इतिहास रचला. महिला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले. किताब जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर खूप भावूक दिसली. मॅच संपल्यानंतर शेफाली वर्माच्या हाती चेंडू कसा सोपवला, त्या बद्दल खुलासा केला.
किताब जिंकल्यानंतर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली की, “ही सुरुवात आहे. आम्हाला हा अडथळा पार करायचा होता. सवय लावून घेणं ही आमची पुढची योजना आहे. आम्ही याची वाट पाहत होतो. तो क्षण आता आलाय. अनेक मोठ्या संधी मिळणार आहेत. आम्हाला सतत सुधारणा करायची आहे. हा शेवट नाही, सुरुवात आहे”
हाच आमच्यासाठी निर्णायक क्षण होता
शेफाली वर्माच्या हाती चेंडू सोपवण्याबद्दल सुद्धा तिने खुलासा केला. “जेव्हा लॉरा आणि सुने स्कोर हळू-हळू पुढे नेत होत्या, तेव्हा मी तिथे शेफालीला उभं असलेलं पाहिलं. तिने चांगली फलंदाजी केलेली. मला वाटलं की, मला माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला पाहिजे. मला माझं मन सांगत होतं की, मी तिला कमीत कमी एक ओव्हर तरी दिली पाहिजे. हाच आमच्यासाठी निर्णायक क्षण होता. अखेरीस दक्षिण आफ्रिकेची टीम थोडी घाबरलेली. तिथेच आमचा फायदा झाला. योग्यवेळी दीप्ती आली आणि तिने विकेट काढले” असं कॅप्टन हरमप्रीत कौरने सांगितलं.
तिला सलाम
शेफाली वर्माने आपल्या संपूर्ण इंटरनॅशनल वनडे करिअरमध्ये 14 ओव्हर टाकल्या आहेत. पण फायनलमध्ये शेफालीने कमालीची गोलंदाजी केली व दोन महत्वाचे विकेट्स काढले. “शेफालीचा टीममध्ये समावेश झाल्यानंतर आम्ही तिला सांगितलेलं की, मॅचमध्ये तुला दोन ते तीन ओव्हर्स टाकाव्या लागतील. त्यावेळी शेफाली म्हणालेली की, मला गोलंदाजी दिली, तर पूर्ण 10 ओव्हर टाकण्याचा मी प्रयत्न करीन. याचं श्रेय तिला जातं. ती पॉझिटिव्ह होती आणि टीमसाठी नेहमी उपस्थित होती. तिला सलाम” असं हरमनप्रीत म्हणाली.
टीमचे कोच अमोल मुजूमदार यांच्याबद्दल काय म्हटलं?
टीमचे कोच अमोल मुजूमदार यांच्याबद्दल भारतीय कॅप्टन बोलली की, “अमोल सर टीमसोबत होते. ते नेहमी आम्हाला काहीतरी खास करण्याचं आणि या मोठ्या क्षणासाठी तयारी करण्यास सांगायचे” “आम्हाला सपोर्ट स्टाफ आणि बीसीसीआयला श्रेय दिलं पाहिजे. आम्ही आमच्या टीममध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. त्यामुळेच आज आम्ही इथे आहोत” असं हरमनप्रीत म्हणाली.
