Mohmmed Siraj: तो मुस्लमान आहे ना म्हणूनच भेदभाव…सिराजला Playing Xi मधून वगळल्यानंतर काँग्रेस खासदाराचा संताप
Mohmmed Siraj IND vs NZ 1st Test: भारत न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना सुरु असून या सामन्यात मोहम्मद सिराजला वगळण्यात आले आहे.

IND vs NZ Test Match: वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळल्याचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी सिराजच्या नावाशी आणि ओळखीशी संबंध जोडून, त्याला भारतीय संघातून वगळण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मसूद म्हणाले की, “सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असूनही सिराजला बाकावर बसवणे अनाकलनीय आहे.”
सिराजला वगळण्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना इम्रान मसूद म्हणाले की, “संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची अलीकडील कामगिरी पुरेशी होती. ” या निर्णयामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस खासदार म्हणाले, “त्याचे नाव सिराज आहे, म्हणजेच तो मुस्लान आहे, हे पुरेसे कारण नाही का? जर तो चांगली कामगिरी करत असूनही त्याची निवड होत नसेल, तर दुसरे काय कारण असू शकते? हेच एकमेव कारण असू शकते, दुसरे कोणतेही कारण नाही.”
#WATCH | Delhi: On Cricketer Mohammed Siraj, Congress MP Imran Masood says, “It is being said that despite his good performance, he was not given a place in the team. His name is ‘Siraj ‘, and that is why he was not given a place. If you are not selecting him despite his good performance, the discrimination is clear.”
— ANI (@ANI) November 20, 2026
गुरुवारी वेलिंग्टनमध्ये सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी, भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसह जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप यांचा समावेश असलेले चार गोलंदाजांचे आक्रमण मैदानात उतरवले. सध्याच्या डब्ल्यूटीसी चक्रात भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असूनही, अनुभवी सिराजला संघातून वगळण्याच्या या धोरणात्मक निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मोहम्मद सिराजला वगळण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोटक म्हणाले की, ‘कर्णधार आणि व्यवस्थापनाने परिस्थितीनुसार सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवला आहे. सर्वोत्तम संघ संयोजनाच्या आधारावर प्लेइंग इलेव्हन निवडण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराची आहे. मला वाटते की प्रत्येकाला वाटले की ही शक्य असलेली सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हन आहे आणि त्यांनी तीच निवडली. मला या निर्णयात काहीही चुकीचे दिसत नाही.”
