Abhishek Sharma : याला म्हणतात युवराजचा चेला! अभिषेक शर्मानं 30 बॉलमध्ये झळकावलं ऐतिहासिक शतक; हिटमॅनलाही मागे टाकलं
Abhishek Sharma fastest century : षटकारांवर षटकार, चौकारांवर चौकार... दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अभिषेक शर्माने इतिहास रचला. डावखुऱ्या फलंदाजाने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूंत शतक झळकावले. यासह अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने वादळी फलंदाजी करत क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 30 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील अनेक मोठे जागतिक विक्रम मोडीत काढले. अभिषेक शर्माने आपले शतक पूर्ण करताना अवघ्या 30 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकार ठोकले. शतक पूर्ण करताना त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 333.33 इतका होता.
अभिषेक शर्माचे हे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले आहे. या शतकासह तो कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान शतक आहे. रोहित शर्माचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत अभिषेक शर्माने भारतासाठी सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक झळकावण्याचा माजी कर्णधार रोहित शर्माचा नऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
रोहित शर्माने 2017 मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूंत शतक झळकावले होते, ज्याचा रेकॉर्ड आता अभिषेकने आपल्या नावावर केला आहे. शतकानंतरही त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. अखेर तो 34 चेंडूंत 108 धावा करून बाद झाला. आपल्या या ऐतिहासिक डावात त्याने एकूण 9 चौकार आणि 11 षटकार मारले. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने त्याचा हा झंझावाती डाव रोखत त्याची विकेट काढली.
सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी20 शतके
27 चेंडू – साहिल चौहान (एस्टोनिया विरुद्ध सायप्रस, 2024)
29 चेंडू – मुहम्मद फहाद (तुर्की विरुद्ध बल्गेरिया, 2025)
30 चेंडू – अभिषेक शर्मा (भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 2026)
33 चेंडू – जॅन निकोल लॉफ्टी-इश्टन (नामिबिया विरुद्ध नेपाळ, 2024)
33 चेंडू – सिकंदर रझा (झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया, 2024)
33 चेंडू – फिन ॲलन (दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, 2026)
भारत अंतिम 11
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह
