
लंडनमधील प्रसिद्ध ओव्हल क्रिकेट मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला, ज्यामुळे अनेक षटकांचा खेळ होऊ शकला नाही आणि खेळ अनेक वेळा थांबवावा लागला. ही परिस्थिती दोन्ही संघांसाठी, विशेषतः भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे, कारण हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या दिवसाकडे लागलं आहे. जो या सामन्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. मात्र, त्यातच भारतीय चाहत्यांसाठी ओव्हलमधून एक वाईट बातमी देखील आली आहे.
पावसाचा अडथळा येण्याची शक्यता
पहिल्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला होता आणि आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज, म्हणजेच 1 ऑगस्ट रोजीही ओव्हलवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या स्थानिक वेळेनुसार, दुपारी 2 नंतर पावसाची 46 टक्के शक्यता आहे, जी दिवसा उजाडताच तीव्र होऊ शकते. या पावसाचा परिणाम फक्त आजच्या खेळावरच नव्हे तर या सामन्याच्या पूर्ण निकालावरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, भारतीय संघाला मर्यादित वेळेत चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांची रणनीती लवकर बदलावी लागेल. मात्र, पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यास सामन्याचा उत्साह कमी होऊ शकतो आणि भारताच्या विजयाच्या शक्यतांवरही परिणाम होऊ शकतो.
पहिल्या दिवशी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी दोन्ही संघांसाठी दुसरा दिवस खूप महत्त्वाचा असेल. जर भारताला ही 5 कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णित राखायची असेल, तर त्यांना मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजीने मैदानावर वर्चस्व गाजवावे लागेल. तर दुसरीकडे, इंग्लंड संघालाही या संधीचा फायदा घेऊन आपली आघाडी कायम ठेवायची आहे. जर पाऊस असतानाच खेळ झाला तर खेळपट्टीवरील ओलावा वाढू शकतो, जो वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल.
पहिल्या दिवसाचा खेळ कसा झाला ?
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 64 षटके टाकण्यात आली. टीम इंडियाला 6 विकेट गमावून 204 धावा करता आल्या. करुण नायर 52 धावांवर तर आणि वॉशिंग्टन सुंदर 19 धावांवर नाबाद खेळतोय.