Asian Games 2026: टीम इंडियाची थेट फायनलमध्ये एन्ट्री, आता गोल्डसाठी श्रीलंकेशी लढणार, कधी असणार सामना?
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशला पराभूत सरुन थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी झाला. या सामन्यात भारताने बांगलादेशला ११४ धावांनी पराभूत करून रौप्य पदक पटकावले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारतीय संघ सुवर्णपदकासाठी अंतिम सामन्यात श्रीलंकेशी सामना करेल. या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ गडी गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ १५.४ षटकांत ८१ धावांवर सर्वबाद झाला.
शफाली वर्माने बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी करत एक उत्कृष्ट शतक झळकावले. तिने शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत ४९ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ९ षटकारांसह आपले १०० धावा पूर्ण केल्या. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. व्हाईट-बॉल क्रिकेटमधील हे तिचे पहिले शतक असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, भारतासाठी स्मृती मंधानाने ३७ धावा (१९ चेंडू) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ४० धावा (३३ चेंडू) केल्या. दरम्यान, कमलिनला केवळ ३ धावा, रिचा घोषला २ धावा करता आल्या आणि भारती फुलमाली ९ धावांवर नाबाद राहिली. बांगलादेशसाठी मरुफा अख्तर, शंजिदा अख्तर, रबिया खान आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झुएरिया फिरदौस शून्यावर बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर, विकेट्स सातत्याने पडत राहिल्या. सलामीवीर दिलिरा अख्तर, शर्मिन अख्तर (१० धावा) आणि सुलताना खातून (१२ धावा) यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिलीरा २३ चेंडूंमध्ये २७ धावा करून बाद झाली. या खेळीत तिने चार चौकार आणि एक षटकार मारला. उर्वरित फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. भारताकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला आठ गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता सुवर्णपदकासाठी अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध खेळतील. हा सामना २२ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. विजयी संघाला सुवर्णपदक मिळेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. कांस्यपदकासाठी पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होईल.
