भारतीय महिला संघाचा विजयी “चौकार”

  • Sachin Patil
  • Published On - 10:02 AM, 18 Nov 2018
भारतीय महिला संघाचा विजयी "चौकार"

गयाना : महिलांच्या 20-20 विश्वचषक सामन्यात  भारतीय संघाने सलग चौथा विजय मिळवला आहे. भारताने शनिवारी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. भारताने ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी धूळ चारत दमदार विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधनाच्या चमकादर 83 कामगिरिने भारताला विजय मिळवणे सोपे झाले. भारताने सलग चार सामने जिंकून ‘ब’ गटात आपले पहिले स्थान कायम राखले. 22 नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्यफेरीत भारताचा सामना वेस्टइंडीज किंवा इंग्लंड सोबत होईल.

भारताने पहिली फलंदाजी करत 168 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले. ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने 19.4 षटकात 9 बाद, 119 धावांवर रोखलं.

सामनावीर मानधनाने 55 चेंडूत चमकदार कामगिरी करत नऊ चौकार आणि तीन षटकार लगावले. तर कर्णधार हरमनप्रीत कौरनेही मानधनाला चांगली साथ दिली. हरमनप्रीतने 27 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार अशी कामगिरी करत 43 धावा केल्या.

वेदा कृष्णमूर्ती 3 धावांवर तंबूत परतली. तर हेमलताची 1 वरच ऑस्ट्रेलियाच्या पेरीने विकेट घेतली. तर अरुंधतीने चार चेंडूत एक चौकारासह 6 धावा केल्या.

भारताच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली. भारताकडून कोल्हापूरच्या अनुजा पाटीलनं 15 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. दीप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये पेरीने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तिने तीन षटकात फक्त 16 धावा दिल्या. किमिंस आणि गार्डनरने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर मेगन शटने 1 विकेट्स.