IPL 2020 | आधीच दिल्लीला पराभवाचा धक्का, आता श्रेयस अय्यरला बारा लाखांचा दंड

| Updated on: Sep 30, 2020 | 12:13 PM

आयपीएलमध्ये 'सनरायझर्स हैदराबाद'विरुद्ध सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 'दिल्ली कॅपिटल्स'चा कर्णधार श्रेयस अय्यरला दंड ठोठावण्यात आला आहे

IPL 2020 | आधीच दिल्लीला पराभवाचा धक्का, आता श्रेयस अय्यरला बारा लाखांचा दंड
Follow us on

अबू धाबी : आयपीएलमध्ये (IPL 2020) ‘सनरायझर्स हैदराबाद’कडून (Sunrisers Hyderabad) पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर ‘दिल्ली कॅपिटल्स’चा (Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आणखी एक झटका मिळाला आहे. श्रेयसला स्लो ओव्हर-रेट कायम राखल्याबद्दल बारा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (IPL 2020 Shreyas Iyer fined Rs 12 lakh for Delhi Capitals’ slow over rate against Sunrisers Hyderabad)

आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान ओव्हर रेट राखण्यासंबंधी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेयसकडून दंड आकारला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये ‘सनरायझर्स हैदराबाद’ने पहिल्यांदाच नियम मोडला.

“अबू धाबी येथे 29 सप्टेंबर 2020 रोजी ‘ड्रीम 11 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020’ तील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान ‘दिल्ली कॅपिटल्स’ने स्लो ओवर रेट कायम ठेवल्याबद्दल कर्णधार श्रेयस अय्यर यांना दंड ठोठावण्यात आला आहे” असे आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत त्याच्या संघाने पहिल्यांदाच नियम मोडला. त्यामुळे श्रेयस अय्यर यांना 12 लाख रुपये दंड भरण्याचे आदेश आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीचा पहिला पराभव

सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात केली. सलग दोन वेळा विजयी झालेल्या दिल्लीचा विजयरथ हैदराबादने रोखला. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर 163 धावसंख्येचे लक्ष ठेवले होते, मात्र दिल्ली कॅपिटल्स 7 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावाच करु शकला.

सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्यातच षटकात 2 धावांवर बाद झाला. शिखर धवन, रिषभ पंत, हेटमायर यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. हैदराबादकडून राशीद खानने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतल्या.

विराटच्या पावलावर अय्यरचे पाऊल

आयपीएल 2020 मध्ये स्लो ओव्हर रेटशी संबंधित हा दुसरा अपराध आहे. गेल्या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेट कायम ठेवल्यासाठी दोषी ठरवण्यात आले होते. त्यालाही बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

कर्णधार विराट कोहलीला दणका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

(IPL 2020 Shreyas Iyer fined Rs 12 lakh for Delhi Capitals’ slow over rate against Sunrisers Hyderabad)