अवघ्या 14 वर्षांचं पोर, IPL मध्ये तुफान खेळला, तरी वैभव सूर्यवंशीला रडू का कोसळलं?

अवघ्या 14 वर्षांचा तुफानी क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याची संपूर्ण देशात चर्चा आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांना चकित करून टाकणारी फलंदाजी केली आहे.

अवघ्या 14 वर्षांचं पोर, IPL मध्ये तुफान खेळला, तरी वैभव सूर्यवंशीला रडू का कोसळलं?
ipl 2025 vaibhav suryavanshi
| Updated on: Apr 20, 2025 | 3:35 PM

Vaibhav Suryawanshi : अवघ्या 14 वर्षांचा तुफानी क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याची संपूर्ण देशात चर्चा आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांना चकित करून टाकणारी फलंदाजी केली आहे. मैदानावर आल्यानंतर त्याने पहिल्याच सामन्यात, पहिल्याच चेंडूत थेट षटकार लगावला आहे. दरम्यान, त्याच्या फलंदाजीचे देशभरात कौतुक होत असले तरी बाद झाल्यानंतर मात्र त्याला रडू कोसळले आहे. वाहवा होत असली तरी त्याला अश्रू का अनावर झाले, असे विचारले जात आहे. याबाबतच वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी त्यांच्या रडण्याची तीन कारण सांगितली आहेत.

वैभवची तुफानी खेळी, करिअर कसं?

भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात वैभव सूर्यवंशी हे नाव मोठ्या आदराने घेतलं जाणार आहे. कारण त्याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षात रणजी ट्रॉफीत खेळताना इतिहास रचला होता. त्याने अंडर-19 टुर्नामेंटमध्ये तिहेरी शतक झळकावून सर्वांनाच चकित केलं होतं. त्यानंतर 13 व्या वर्षी भारताच्या अंडर-19 संघात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना अवघ्या 58 धावांत त्याने दमदार असे शतक झळकावले होते. त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने तब्बल 1.1 कोटी रुपये देऊन संघात घेतलं आहे.

20 चेंडूंमध्ये 34 धावा

आयपीएलच्या 18 व्या सिझनमध्ये 19 एप्रिल रोजी तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला आयपीएल सामना खेळला. त्याने पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर थेट षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरदेखील षटकरा लगावून सर्वांना चकित करून टाकलं. त्याने आपल्या खेळीत 20 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. बाद झाल्यानंतर मैदानातून बाहेर निघताना मात्र त्याला अश्रू अनावर झाले.

वैभव सूर्यवंशीला रडू का कोसळलं?

वैभवने अशी शानदार खेळी केल्यानंतरही त्याला रडू का कोसळलं? याबाबत त्याचे प्रसिक्षक मनीष ओझा यांनी तीन कारणं सांगितली आहे. वैभवचं रडणं हा त्याच्यातील साधेपणा दाकवतं. तो अजूनही एक लहान मुलगा आहे, असंच यातून दिसतंय, असं ओझा यांनी सांगितलं. तसेच कदाचित त्याच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लॅन असावा. सामना जिंकूनच परत यावं, असं त्याच्या डोक्यात असेल. हे त्याला जमू शकलं नाही, म्हणूनच कदाचित तो रडला असावा, असं ओझा यांनी दुसरं कारण सांगितलं. तसेच आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक किंवा शतक झळकावलं असतं तर त्याच्यासाठी हा सामना खास ठरला असता. याच गोष्टीचं कदाचित त्याला दु:ख असावं, असं तिसरं कारण ओझा यांनी सांगितलं.


दरम्यान, वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात अर्धशतक किंवा शतकी खेळ दाखवू शकला नसला तरी आगामी सामन्यांत त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे हे स्वप्न आयपीएलच्या पुढच्या सामन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.