IPL 2026 : राजस्थान रॉयल्सला मिळाला नवा कर्णधार, 24 वर्षीय खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

RR New Captain : राजस्थान रॉयल्सने आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानने एका 24 वर्षीय युवा फलंदाजाला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सला मिळाला नवा कर्णधार, 24 वर्षीय खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
RR New Captain
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2026 | 7:10 PM

आयपीएलमधील संघांनी आगामी सीजनच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता राजस्थान रॉयल्सने आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानने एका 24 वर्षीय युवा फलंदाजाला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आगामी सीजनमध्ये संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर आता फ्रँचायझीने युवा आक्रमक फलंदाजाकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. हा खेळाडू गेल्या 7 सीजनपासून राजस्थानच्या संघाचा भाग आहे. त्याने या संघाकडून 84 आयपीएल सामने खेळले असून 1566 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. या खेळाडूबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कर्णधारपदाचा अनुभव

राजस्थान रॉयल्सने रियान परागची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी जेव्हा सॅमसनला दुखापत झाली होती, तेव्हा काही सामन्यांमध्ये रियानने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आठ आयपीएल सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने फक्त एक सामना जिंकला आणि सहा वेळा पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. मात्र रियानने फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने 14 सामन्यांमध्ये 393 धावा केल्या होत्या, यात त्याचा स्ट्राईक रेट 166.53 होता. त्याने केकेआरविरुद्ध 95 धावांची आक्रमक खेळी केली होती.

राहुल द्रविडनेही राजस्थानची साथ सोडली

संजू सॅमसनसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील आगामी सीजनपूर्वी आरआरपासून वेगळा झाला आहे. द्रविडनंतर आता श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकारा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. संगकारा 2021 पासून फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक आहेत. तसेच त्यांनी 2021 ते 2024 या काळात संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम करत होते. आता ते पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान, गेल्या हंगामात आरआरची निराशाजनक कामगिरी होती, संघाने 14 पैकी फक्त 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. राजस्थानने रवींद्र जडेजालाही संघात सामील केले आहे. त्यामुळे जडेजाकडे संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता होती. तसेच युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालही कर्णधार पदाच्या शर्यतीत होता, मात्र आता राजस्थानने रियान परागच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.