रवी शास्त्री नव्हे, भारताच्या प्रशिक्षकपदासाठी 'हे' नाव आघाडीवर

विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्येच भारतीय संघ बाहेर झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाल संपला असून नव्या प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. यात रवी शास्त्रींसह अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे.

रवी शास्त्री नव्हे, भारताच्या प्रशिक्षकपदासाठी 'हे' नाव आघाडीवर

नवी दिल्ली : विश्वचषकाच्या (CWC) सेमीफायनलमध्येच भारतीय संघ बाहेर झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाल संपला असून नव्या प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. यात रवी शास्त्रींसह अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर टॉम मुडी यांनीही अर्ज केल्याने प्रशिक्षकपदाची स्पर्धा चांगलीच वाढली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यास अधिक आनंद होईल, असे म्हटले आहे. तरिही या स्पर्धेत अनेक दिग्गज उतरल्याने कुणाची निवड होणार हा प्रश्न बाकी आहे.

मंगळवारी (30 जुलै) प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. दरम्यान, प्रशिक्षकपदासाठी टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन, श्रीलंकेचे माजी क्रिकेटर महेला जयवर्धने, भारताचे माजी ऑलराऊंडर रॉबिन सिंह आणि भारतीय मॅनेजर आणि जिम्बाब्वेचे प्रशिक्षक राहिलेल्या लालचंद राजपूत यांनी देखील अर्ज केले आहे. या व्यतिरिक्त माजी कसोटी खेळाडू प्रवीण आमरे यांनी बॅटिंग प्रशिक्षक पदासाठी साऊथ आफ्रिकेचे जोंटी रोड्स यांनी फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज केल्याचे समजते आहे. रवी शास्त्री आणि त्यांच्या प्रशिक्षक टीमला प्रक्रियेत थेट प्रवेश मिळणार आहे.

रॉबिन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे, “सलग दोन विश्वचषक हरल्याने आणि टी20 चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्येच बाहेर झाल्याने संघातील बदल चांगला ठरेल. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपला आहे. मात्र, त्यांच्यासह इतर प्रशिक्षकांना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपेल.

नव्या प्रशिक्षकाची निवड क्रिकेट बोर्ड अडव्हायजरी कमिटी (CAC) करेल. यात कपिल देव, माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड आणि भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षक शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

विराट कोहलीने वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्रींना पुन्हा निवडल्यास आपल्याला आनंद होईल, असे मत व्यक्त केले होते. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या जातील तेव्हा 57 वर्षीय रवी शास्त्री वेस्ट इंडिजमध्ये असतील. त्यामुळे ते तेथूनच व्हिडीओ कॉलद्वारे मुलाखत देतील.

शास्त्री 2014 ते 2016 दरम्यान भारतीय संघाच्या संचालकपदी होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. कुंबळे यांनी 1 वर्षापर्यंत प्रशिक्षक म्हणून काम केले, मात्र कर्णधार विराट कोहलीसोबतच्या संघर्षामुळे त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *