IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘महाभारत’ ! हार्दिक बाहेर पडल्यावरच रोहित खेळण्यास तयार?, संघात नक्की काय घडतंय?
Mumbai Indians Rohit Sharma vs Hardik Pandya : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली खेळायचे नाही का? ४ मेच्या रात्री हार्दिक पांड्या लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध मुद्दाम खेळला नाही का? अशा अनेक चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सोशल मीडियावरही बरीच चर्चा होत्ये.

IPLमध्ये पाच वेळा विजेती ठरलेली मुंबई इंडियन्स टीम सध्या अडचणीत आहे. या सीझनमध्ये त्यांना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. आणि त्यात भरीस भर म्हणजे संघाच्या ड्रेसिंग रूममधील मतभेद आता मैदानावरही दिसू लागले आहेत. हार्दिक पांड्या याला कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवायलाच विसरली आहे. चॅम्पियन बनणे तर दूरच, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठीही टीमला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. काल रात्री लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना मुंबईने जिकंला खरा, पण तरीही चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
84 धावा करत रोहित शर्माचे दमदार पुनरागमन
वानखेडे स्टेडियमवर, काल सोमवारी, 4 मे रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला सहा विकेट्सने हरवलं आणि नॉकआउटमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र या विजयापेक्षा संघातील खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दलच जास्त चर्चा होत्ये. हार्दिक पंड्या या सामन्यात खेळला नाही, तर आतापर्यंत अनफिट असल्याचं बोललं जाणारा रोहित शर्मा मात्र अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला. एवढंच नव्हे तर फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहितने 44 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 7 षटकारांसह 84 धावांची शानदार खेळीदेखील केली.
पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास रोहितचा नकार ?
त्यानंतर आता सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. तिथे असा दावा केला जातोय की रोहित शर्मा आतापर्यंत जाणूनबुजून प्लेईंग इलेव्हनपासून दूर राहिला. पण काल सूर्यकुमार यादवकडे कॅप्टन्सी येताच रोहित खेळण्यास तयार झाला. काहींचं तर असंही म्हणणं आहे की, रोहित शर्मा हा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक नाहीये, आणि तोच रोहित सूर्याच्या नेतृत्वाखाली अधिक आरामात खेळताना दिसतोय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
हार्दिक पांड्या अचानक बाहेर का?
लखनऊविरुद्धच्या विजयांनंतर ओपनर रियान रिकेल्टन याने हार्दिकबद्दल सांगितल की, “तो कधी परत येईल हे मला माहीत नाही. त्याच्या पाठीला ताण आलाय, हे मलाच आज दुपारी कळलं. त्याच्या दुखापतीची तीव्रता किती आहे हे मला ठाऊक नाही, पण तो या आठवड्यात रायपूरमधील सामन्यासाठी परत येईल अशी आशा आहे” असं रिकेल्टन म्हणालाय. हार्दिकला दुखपात झाल्याचं टॉसनंतर संघाचा कार्यवाहक कर्णधार सूर्यकुमार यादवयाने सांगितलं होतं.
मुंबईची प्लेऑफची आशा कायम
कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 5 विकेट्स गमावत 228 धावा केल्या. निकोलस पूरन (21 चेंडूंमध्ये 63), मिचेल मार्श (25 चेंडूंमध्ये 44) आणि हिम्मत सिंह (31 चेंडूंमध्ये नाबाद 40) यांनी चांगली कामगिरी केली. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि रियान रिकेल्टन या दोघांनी अर्धशतके झळकावत शतकी भागीदारी केली, त्यांची शानदार खेळी होती.
या विजयामुळे मुंबई इंडियन्सचे 10 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण झाले असून संघ नवव्या स्थानावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सला सलग सहावा पराभव पत्करावा लागला असून 9 सामन्यांत 4 गुणांसह ते शेवटच्या स्थानावर आहेत.