विराट-अजिंक्यऐवजी रोहित शर्माकडे कसोटी संघाचं नेतृत्व सोपवा; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा सल्ला

| Updated on: Nov 30, 2020 | 7:59 AM

कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

विराट-अजिंक्यऐवजी रोहित शर्माकडे कसोटी संघाचं नेतृत्व सोपवा; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा सल्ला
Follow us on

मुंबई : एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये आधी एक टी-20 मालिका आणि नंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचं नेतृत्व करणार आहे. परंतु विराट आणि अजिंक्यऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कसोटी संघाचं नेतृत्व द्यायला हवं, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) याने मांडलं आहे. (Michael Clarke says Rohit Sharma should be a captain in test series after Virat kohli)

कांगारुंच्या संघाला 2015 मध्ये विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार मायकल क्लार्कने रोहित शर्माचं खूप कौतुक केलं, इंडिया टुडेशी बोलताना क्लार्क म्हणाला की, रोहित जबरदस्त खेळाडू आहेच, तसेच त्याच्याकडे संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभवही आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मी भारतीय संघाची निवड करणार असतो आणि मला माहीत असतं की, विराट एक कसोटी सामना खेळून मायदेशी परतणार आहे, तर मी 100 टक्के रोहित शर्माची संघात निवड केली असती. तसेच विराटच्या अनुपस्थितीत रोहितकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली असती. विराटच्या अनुपस्थितीत क्रिकेटच्या सर्व प्रकारात मी रोहितलाच कर्णधार केलं असतं.

रोहितला फिट करण्यासाठी पूर्ण ताकद लावली असती

आयपीएल 2020 स्पर्धेदरम्यान रोहित दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या गुडघ्याचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. परंतु अनेक माजी क्रिकेटर, समीक्षक आणि माध्यमांच्या टीकेनंतर रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी संघात निवड करण्यात आली परंतु त्याअगोदर रोहितला त्याच्या दुखापतीमधून सावरणं आवश्यक आहे. तसेच त्याला फिटनेस ट्रेनिंग घेणं गरजेचं होतं. त्यामुळे रोहित सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. रोहितचं प्रशिक्षण कधी पूर्ण होणार याबद्दल एनसीएकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे रोहित कांगारुविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तसेच उर्वरित दोन सामन्यांसाठी रोहित ऑस्ट्रेलियाला कधी रावाना होणार, तो जाणार आहे की नाही, याबाबत अजूनही सांशकता आहे.

रोहितच्या फिटनसबाबत क्लार्क म्हणाला की, “रोहित फिट व्हावा यासाठी मी माझी पूर्ण ताकद लावली असती. तसेच त्याला कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावली असती. महत्त्वाचं म्हणजे संघाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं असतं”.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या जागी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सर्वोत्तम आहे, असं विधान ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी केलं आहे. “भारतीय संघाला विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यच्या रुपाने एक सर्वोत्तम कर्णधार मिळाला आहे. जिथवर कर्णधारपदाचा प्रश्न आहे, मी अजिंक्यला काही वर्षांपूर्वी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना पाहिलंय. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. अजिंक्यच्या नेतृत्वामुळे मी प्रभावित झालो होतो”, असं इयन चॅपल म्हणाले.

2017 मध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेतील धर्मशाळा येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार विराट दुखापतग्रस्त झाला होता. विराटला दुखापत झाली तेव्हा मालिकेची स्थिती 1-1 अशी बरोबरीत होती. या दुखापतीमुळे अजिंक्यला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या सामन्यात अजिंक्यने आपल्या नेतृत्वात भारताला 8 विकेट्सने विजय मिळवू दिला होता. 2-1 सह टीम इंडियाने कांगारुंवर मात केली होती.

…म्हणून विराटऐवजी अजिंक्य संघाचं नेतृत्व करणार

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधीदरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3 कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे या तीनही कसोटी सामन्यांमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

कर्णधार कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय

गौतम गंभीर म्हणतो, ‘हा’ खेळाडू अर्धा फिट पण काय करणार टीमकडे दुसरा पर्याय नाही!

(Michael Clarke says Rohit Sharma should be a captain in test series after Virat kohli)