IPL 2026 Hardik Pandya : आयपीएलमध्ये मुंबईची हाराकिरी, हार्दिक पंड्याला भोगावे लागणार परिणाम? कोणत्याही क्षणी मोठा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर, आता कर्णधार हार्दिक पांड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबईच्या कामगिरीवर संघ व्यवस्थापन नाराज असून त्याचे परिणाम आता बोगावे लागू शकतात.

इंडियन प्रीमियर लीग 2026 चा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही. सतत होणारे पराभव, खेळाडूंच्या चुका, ढिसाळा फिल्डींग, यामुळे एकेकाळी 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा यंदा अतिशय खराब परफॉर्मन्स दिसून आला. यामुळे संघ व्यव्थापन नाराज असून त्याचा फटका आता कर्णधार हार्दिक पंड्याला बसू शकतो. हार्दिक पांड्याला संभाव्य परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिककडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं. या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सशी संबंधित तीन व्यक्तींनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोडावं लागू शकतं.
एवढंच नव्हे तर, मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण होणार याबाबत फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरू असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की, हार्दिक पांड्याकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या अफवा का वाढत आहेत? आयपीएल 2026 च्या 10 संघांच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर होता, केवळ याच कारणामुळे हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवले जाईल, की यामागे आणखी काही कारण आहे ? ” टीम मॅनेजमेंट त्याला कर्णधारपदी कायम ठेवण्यास उत्सुक नसल्याचे अनेक संकेत या सीझनदरम्यान मिळाले. संघामध्ये यावर चर्चा सुरू होती” असं एका सूत्राने सांगितलं.
हार्दिकच्या कर्णधारपदावर धोक्याचं सावट का ?
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून का हटवले जाऊ शकते, यामागच्या काही कारणांवर एक नजर टाकूया.
मुंबई इंडियन्सचं खराब प्रदर्शन
हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 मध्ये खूपच खराब कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातील या सर्वात यशस्वी संघाने साखळी फेरीतील 14 पैकी 10 सामने गमावले. त्या 10 पैकी आठ सामने हार्दिकच्या कर्णधारपदाखाली गमावले होते. दुखापतीमुळे हार्दिक आयपीएल 2026 मध्ये चार सामने खेळू शकला नाही. आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, हा संघ पॉईंट टेबल्समध्ये 9 व्या स्थानी होता.
हार्दिकचं खराब प्रदर्शन
संघाच्या खराब कामगिरीसोबतच हार्दिक पांड्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीतही मोठी घसरण झाल्याने त्याच्या अडचणी दुप्पट वाढल्या. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून, हार्दिक पांड्या आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. 10 आयपीएल सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने22.88 च्या सरासरीने आणि 138.25 च्या स्ट्राइक रेटने 206 धावा केल्या. गोलंदाजी बाबात बोलायचं झालं तर त्या ने64.75 च्या सरासरीने केवळ चार बळी घेतले.
खेळाडूही पंड्यावर नाराज – रिपोर्ट्स
आयपीएल 2026 दरम्यान, असा एक रिपोर्ट समोर आला, ज्यात असं म्हटलं होतं की, मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू, विशेषतः वरिष्ठ खेळाडू, हार्दिक पांड्यावर नाराज होते. फ्रँचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलं नसलं तरी, काहीतरी गडबड असल्याशिवाय संशय निर्माण होत नाही. फ्रँचायझी हार्दिककडून कर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयामागे हे एक प्रमुख कारण असू शकते.
अनफिट पंड्या
हार्दिक पांड्यासाठी फिटनेस ही एक मोठी समस्या आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो आयपीएल 2026 मध्ये 4 सामने खेळू शकला नाही. संघाच्या कर्णधाराच्या फिटनेसच्या अभावामुळे संघाच्या कामगिरीत अडथळा येणे स्वाभाविक आहे. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हे स्पष्ट झाले.
फ्रँचायझीचा पांड्यावरील विश्वास डळमळीत
हार्दिक पांड्या एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, यात काहीच शंका नाही. मात्र, आयपीएलच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझीसाठी कर्णधार आणि खेळाडू या दुहेरी भूमिकेत त्याची कामगिरी खालावली, ज्यामुळे फ्रँचायझीचा त्याच्यावरील विश्वास डळमळीत झाला .
आयपीएल 2026 नंतर हार्दिक पांड्या गेला फिरायला
हार्दिक पांड्याकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेतलं तर त्यानंतर फ्रँचायझीला त्याचा पाठिंबा कायम राहील की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे, पुढच्या हंगामात तो दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळल्यास फार आश्चर्य वाटणार नाही. सध्या, हार्दिक पांड्या आयपीएल 2026 चे विजेतेपद गमावल्याच्या दुःखातून सावरण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड, महिका शर्मासोबत फ्रान्सला फिरायला गेला आहे.