Veda Sarfare: रांगण्याच्या वयात पाण्यात लांब सूर! चिमुकल्या जलतरणपटूचे किती करू कौतुक, वेदा सरफरे हिने रचला इतिहास, 10 मिनिटात 100 मीटर पोहली

Ratnagiri Veda Sarfare Youngest Swimmer: एक-दीड वर्षाचं बाळ उभं राहिलं तरी आपल्याला कोण कौतुक असतं नाही? पण या चिमुकलीनं तर मोठा रेकॉर्ड नावावर कोरला. अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांच्या वेदा सरफरेने 10 मिनिटात 100 मीटरचा पल्ला गाठला. पोहण्यात नवीन विक्रम नावावर केला.

Veda Sarfare: रांगण्याच्या वयात पाण्यात लांब सूर! चिमुकल्या जलतरणपटूचे किती करू कौतुक, वेदा सरफरे हिने रचला इतिहास, 10 मिनिटात 100 मीटर पोहली
रत्नागिरी वेदा सरफरे, लहान जलतरणपटू
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 11, 2025 | 9:25 AM

India Book Of Records: दोन वर्षांच्या बाळाचे बोबडे बोल आणि त्याचं अडखळत उभं राहणं हा कौतुकाचा विषय असतो. आई-वडिलांना त्याचा कोण हर्ष होतो. पण रत्नागिरीतील एक वर्ष नऊ महिन्याच्या वेदा सरफरे (Veda Sarfare) हिने तर मोठी कमाल केली आहे. ही चिमुरडी सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे. तिने 10 मिनिटात 100 मीटरचा पल्ला गाठता इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. पण वेदाचे पाय पाण्यात दिसले असं कौतुकानं म्हटलं जातंय. तिच्या या अचाट कामगिरीने सध्या कोकणवासीय भारावून गेले आहे.

नऊ महिन्यांची असताना पाण्यात

तर वेदा ही नऊ महिन्यांची असतानाच तिचा पोहण्याचा श्रीगणेशा झाला. रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात तिने पाण्यात सूर मारला. तिने पोहायला सुरुवात केली. तिला पोहचण्याची आवड लागली. तिने इतक्या कमी वयात कसून सराव केला. अवघ्या 1 वर्षे 9 महिन्यांच्या वेदाने मग विक्रमाला गवसणी घातली. अर्थात तिने काय कमाल करून दाखवली, हे तिच्या गावी सुद्धा नाही. तिने 100 मीटर अंतर अवघ्या 10 मिनिटे 8 सेकंदात पूर्ण केले. या काळात तिने मन लावून तिचे लक्ष पूर्ण केले हे विशेष. या विक्रमामुळे ती भारतातील सर्वात लहान वयातील जलतरणपटू ठरली आहे.

अशी लागली गोडी

वेदाचा मोठा भाऊ रुद्र सरफरे हा शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. आई पायल सरफरे या दोघांना घेऊन जलतरण तलावावर येत असत. त्यावेळी वेदा ही भावाचं पोहणं पाहत होती. तिलाही पाण्यात उतरावासं वाटत होतं. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं. तेव्हा वेदाला गंमत वाटली. ती रडली नाही. उलट तिने पाण्याशी दंगामस्ती सुरू केली. ही बाब मिलके यांनी लागलीच हेरली. त्यांनी तिला हातपाय मारायला शिकवले. हळूहळू काही महिन्यात ती पोहू लागली. तिला पाण्याची भीती वाटेनासी झाली.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

22 जानेवारी 2024 रोजी वेदाचा जन्म झाला आहे. तिला पोहण्याची आवड लागल्यानंतर तिने अवघ्या 10 मिनिटात 100 मीटर पोहण्याचे अंतर कापले. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. याविषयीचा ईमेल 25 नोव्हेंबर रोजी आला. त्यात ती भारतातील सर्वात लहान वयाची जलतरणपटू असल्याचा रेकॉर्ड नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वेदाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट पण आहे. त्यावर तिच्या पोहण्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात येतात. त्यावर अनेक जण लाईक आणि कमेंट करतात.