Badminton : गोव्यात आंतरराज्यीय वेस्ट झोन बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेचं आयोजन, 4 दिवस रंगणार थरार
Inter State West Zone Badminton Championship 2025 : गोव्यात 3 ते 6 असे एकूण 4 दिवस या बँडमिंटन स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गोवेकर आणि क्रीडा चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. जाणून घ्या सर्वकाही

गोव्यातील कॅम्पल इंडोर स्टेडियममध्ये 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान आंतरराज्यीय वेस्ट झोन बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत आघाडीचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान गोवासह एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. या 5 संघांमध्ये गोवा, छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र टीमचा समावेश आहे.
या स्पर्धेची सुरुवात थेट क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल मॅचने होणार आहे. या सामन्यांना 3 सप्टेंबरला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या फेरीत ज्यूनिअर मुलं, ज्युनिअर मुली, मेन्स आणि वूमन्स अशा 4 संघांचे सामने होणार आहेत.
सांघिक फेरीतील अंतिम सामन्याला 4 सप्टेंबरला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 4 सप्टेंबरलाच दुपारी अडीच वाजता एकेरी (सिंगल आणि डबल) स्पर्धेला सुरुवात होईल. या फेरीत एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी (महिला आणि पुरुष) असे सामने होणार आहेत. या फेरीतील अंतिम सामन्यांना 6 सप्टेंबरला सकाळी 9 वाजेपासून सुरुवात होईल.
या चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे काही आघाडीचे बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढेल आणि सामन्यांमध्ये थरार पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेत विविध वयोगटातील अनेक खेळाडू आकर्षणाचा केंद्र ठरणार आहेत. यामध्ये ज्युनिअर आणि मेन्स ग्रुपमधील खेळाडू आहेत. यात छत्तीसगडचे 2 आणि महाराष्ट्रातील एकूण 4 खेळाडूंचा समावेश असणार आहे.
6 खेळाडू आणि त्यांची रँकिंग
छत्तीसगडचा रौनक चौहान हा भारतात ज्युनिअर बॉइज आणि मेन्स सिंगल्स रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आहे. तर छत्तीसगडची तनू चंद्रा ही भारतात ज्युनिअर गर्ल्स रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महाराष्ट्राचे 4 खेळाडू
या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गटातील 4 खेळाडूंचा समावेश आहे. सर्वेश यादव हा भारतातील ज्युनिअर मेन्स रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. देव रुपरेलिया हा 17 वर्षांखालील मुलांच्या क्रमावारीतील नंबर 1 खेळाडू आहे. तारीणी सूरी हे ज्युनियर वूमन्स रँकिगमध्ये दुसर्या स्थानी आहे. तर दर्शन पुजारी हा मेन्स सिंगल्स रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच गुजरातची तसनीम मीर आणि एका आंतरराष्ट्रीय खेळाडूचा समावेश आहे. तसेच मध्यप्रदेशकडून या स्पर्धेत यश रायकर, आदित्य जोशी आणि ऐश्वर्या मेहता असे स्टार खेळाडू सहभागी होतील.
गोवा बँडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष काय म्हणाले?
“आमच्या संघटनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त गोव्यात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळाला, याचा आम्हाला अभिमान आहे. पश्चिम विभागातील अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा वाढेल आणि भावी बॅडमिंटनपटूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल”, असा विश्वास गोवा बँडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
“आमच्या गोवा टीमने या स्पर्धेसाठी जोरदार सराव केला आहे. कोच नवनीत नस्नोडकर आणि अनुप कुशवाह यांच्या मार्गदर्शनात संघाने कठोर मेहनत केली आहे. आमचे खेळाडू वेस्ट झोनमधील तगड्या संघातील खेळाडूंसह भिडण्यासाठी सज्ज आहेत. आम्हाला आमच्या खेळाडूंकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा आहे”, असं गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव प्रवीण शेनॉय म्हणाले.
या चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्नाटकाचे कार्तिक कामत हे रेफरी असणार आहेत. तर तामिळनाडूचे एस वेंकट नारायण हे वाईस रेफरी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. या दोघांवर अचूक निर्णय देण्याची जबाबदारी असणार आहे.
आयोजनाची सर्व जबाबदारी सचिव पराग चौहान यांच्याकडे असणार आहे. अर्नोल्ड रॉड्रिग्ज आणि डार्विन बॅरेटो हे स्पर्धेचे संचालक आहेत. हे दोघे 5 पश्चिम विभागातील पात्र तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मदतीने सामने सुरळीतपणे होतील याची खात्री करतील.
बॅडमिंटन चॅम्पियन्शीप स्पर्धेसाठी गोवा टीम
वूमन्स टीम : आरोही कूटोंकार, जान्हवी महाले, सान्वी ऑडी, शिवांजलि थिते, श्रेया मेहता, सुफिया शेख, सिनोविया डीसूजा, रितिका चेलुरी आणि यासमिन सैयद.
मेन्स टीम : अद्वैत बालकृष्णन, अर्जुन भगत, अर्जुन फलारी, अर्जुन रेहानी, आर्यमन सराफ, अस्विन मन्नाम्बलाथ, आयान शेख, निशांत शेनाई, ओवैस तहसिलदार, रुद्र फडते, शाहीन सी के, सोहम नाईक, तेजन फलारी, वंश खेडकर आणि यूसुफ शेख.
