टीम इंडिया Asia Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत, चीनला 7-0 ने नमवलं
आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात चीनला 7-0 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताने नवव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

भारताने आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेत कमाल केली आहे. एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. भारताने नवव्यांदा आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा मान देखील टीम इंडियाला मिळाला आहे. सुपर 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने चीनला डोकं वर काढूच दिलं नाही. भारताने सुरुवातीपासूनच या सामन्यावर पकड मिळवली होती. पहिल्या सत्रात शिलानंद लाक्राने 3.38 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 6.26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर दिलप्रीत सिंगने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. 7.51 व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. राजकुमार पाल 36.16 व्या मिनिटाला याने मैदानी गोल मारला आणि 4-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर 38 व्या मिनिटाला सुखजीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि चीन पूर्णपणे बॅकफूटवर गेला.
शेवटच्या सत्रात चीन एक गोल मारण्यासाठी धडपड करत राहिला. पण त्यांना काही संधी मिळाली नाही भारताने शेवटच्या सत्रातील 45 व्या आणि 49 व्या मिनिटाला गोल मारला. यासह सामन्यात 7-0 ने आघाडी घेत सामना जिंकला. यासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली असून आता दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. दक्षिण कोरियाने या स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यामुळे भारताला अंतिम सामन्यात कडवं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे जेतेपद मिळवणाऱ्या संघाला थेट हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने नवव्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता चौथ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी दक्षिण कोरियाशी स्पर्धा करेल.
टीम इंडियाचा स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात चीनला 4-3 ने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात जापानला 3-2 ने मात दिली. तिसऱ्या सामन्यात कझाकिस्तानचा 15-0 ने विक्रमी पराभव केला. त्यानंतर सुपर 4 फेरीत पहिला सामना दक्षिण कोरियाशी झाला. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात मलेशियाला 4-1 ने नमवलं. सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात चीनला 7-0 ने नमवलं.
