दे दणा दण गोल..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, हॉकी मॅचमध्ये घडलं असं काही की…
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताची पकड राहिली. पहिल्या हाफमध्ये भारताने 4-2 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघ वचरढ ठरला. भारताने हा सामना 5-3 ने जिंकला.

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत 16 वर्षांपासून सुरू असलेला भारताचा वरचष्मा कायम राहिला आहे. कारण 2010 पासून आतापर्यंत भारताला पराभूत करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. असं असलं तरी या सामन्यात दणादण गोल पाहायला मिळले. पण पाकिस्तानला काही आघाडी घेता आली नाही. पहिल्या हाफपासून गोलच्या बाबतीत भारतीय संघ पुढे राहिला. पाकिस्तानने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण गोलमधील अंतर काही कमी करता आलं नाही. पण शेवटच्या हाफपर्यंत या सामन्यात धाकधूक पाहायला मिळाली.
पहिल्या हाफमधील 30 मिनिटांचा खेळ
पहिल्या 15 मिनिटांच्या क्वॉर्टरमध्ये भारताने सरशी घेतली. सामना सुरू होऊन पाच मिनिटं झाली आणि हरमनप्रीत सिंगने आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतनेच एक जोरदार फटका मारून पाकिस्तानी खेळाडूच्या पायांमधून चेंडू थेट खालच्या उजव्या कोपऱ्यात पोहोचवला. त्यानंतर 11व्या मिनिटाला पुन्हा एका गोल मारला. अभिषेकच्या पासवर पाकिस्तानच्या एका गोलपोस्टला चेंडू लागला आणि दिशा बदलली. त्या संधीचं सोनं करून मनदीप सिंगने हॉकीचा हलका स्पर्श करून चेंडू गोलमध्ये पोहोचवला. यासह भारताने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 2-0 ने आघाडी घेतली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही भारताने दमदार खेळ दाखवला. 21 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल मारला आणि 3-0 ने आघाडी घेतली. पाकिस्तान पिछाडीवर पडल्याचं दिसत होतं. 22 व्या मिनिटाला गोल मारत ही आघाडी कमी केली. सुफियान खानने गोल नोंदवला आहे. आणि 3-1 अशी स्थिती आणली. त्यानंतर 24व्या मिनिटाला अभिषेकने उत्कृष्ट ड्रिब्लिंग करून मैदानी गोल मारत 4-1 स्थिती आणली. पण 25 व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफयान खानने पुन्हा एक गोलने आघाडी कमी केली. पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेऊन गोल मारत 4-2 अशी स्थिती आणली.
दुसऱ्या हाफमधील 30 मिनिटांचा खेळ
पहिल्या हाफच्या दुसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटी भारतीय खेळाडूला ग्रीन कार्ड मिळाले होते. दुसऱ्या हाफच्या सुरूवातील सुखजीतला आता 2 मिनिटांसाठी बाहेर बसावे लागले होते. त्यामुळे भारत 10 खेळाडूंसह खेळत होता. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने जोरदार चढाई केली. पण त्यांना काही यश मिळालं नाही. या क्वॉर्टरच्या काही मिनिटात भारताच्या पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्या संधीचं हार्दिक सिंगने सोनं केलं. चेंडू गोलच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात पाठवून भारताचा सामन्यातील पाचवा गोल मिळवून दिला.
भारताने तिसऱ्या हाफपर्यंत 5-2 अशी आघाडी मिळवली होती. पण पाकिस्तानने एका गोलने आघाडी कमी केली. मैदानाच्या मध्यभागी असताना हार्दिकने चेंडू गमावला, ज्यामुळे पाकिस्तानला प्रतिहल्ला करण्याची संधी मिळाली. या प्रतिहल्ल्यात शाहिदने सामन्यातील आपला दुसरा गोल केला. यासह सामन्याची स्थिती 5-3 अशी राहिली. शेवटच्या मिनिटापर्यंत अशीच गोल स्थिती राहिल्याने भारताने विजय मिळवला. या पराभवासह पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.