लडाख मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा लवकरच! स्पर्धकांनी व्यक्त केल्या अशा भावना
हिमालयाच्या कुशीत असलेल्या लडाखमध्ये रंगणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण जगभर चर्चा आहे. कारण ही सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक आहे. कारण या स्पर्धेत सहनशक्ती, जोम आणि दृढ निश्चयाची परीक्षा होते. या सर्वांवर मात केल्यानंतर काय ते फळ मिळतं.

लडाख मॅरेथॉन ही लेहमध्ये दरवर्षी होणारी लांब पल्ल्याच्या धावण्याची स्पर्धा आहे. 2012 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत कठीण आव्हानांना सामोरं जावं लागतं. लडाखमधील खेळाडूंना स्वतःचे नाव कमावण्याची संधी देण्यासाठी सुरू झालेली ही स्पर्धा जागतिक पातळीवर आता चर्चेचा विषय ठरली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत एकूण सहा प्रकार असून सर्व श्रेणीतील धावपटूंना, हौशींपासून ते जागतिक खेळाडूंपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी आहे. 5 किमी रन फॉर फन इव्हेंटपासून ते 122 किमी अंतर कापणाऱ्या कठीण सिल्क रूट अल्ट्रा मॅरेथॉनपर्यंत शर्यतींचा समावेश आहे. त्यामुळे जगातील सर्वात कठीण लांब पल्ल्याच्या शर्यतींपैकी एक आहे. या सहा शर्यती समुद्रसपाटीपासून 11,500 ते 17,618 फूट (3505 ते 5370 मीटर) उंचीवर पार पडतात. या वर्षी सिल्क रूट अल्ट्रा गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी खारदुंगला चॅलेंज सुरू होईल. 42.195 किमी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि 11.2 किमी स्पर्धा रविवार 14 सप्टेंबर रोजी होतील. रन लडाख फॉर फन ही सर्वात सोपी आणि सर्व वयोगटातील लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय स्पर्धा 13 सप्टेंबर रोजी होईल.
सिल्क रूट अल्ट्रा ही सर्वात आव्हानात्मक स्पर्धा आहे. समुद्रसपाटीपासून 10700 फूट उंचीवर नुब्रा व्हॅलीमधील क्यागर येथे सुरू होते. पारंपारिक सिल्क रूटवरून 122 किमी लांब आणि 17,618 फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला खिंडीपर्यंत आहे. ही शर्यत समुद्रसपाटीपासून 11562 फूट उंचीवर लेहमध्ये संपते. अल्ट्रामॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाची वयोमर्यादा 20 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. सिल्क रूट अल्ट्रा मॅरेथॉनचे (122 किमी अंतर) नियम अधिक कडक आहेत. फक्त निवडक 89सहभागींनाच परवानगी आहे आणि आव्हान स्वीकारणाऱ्यांनी मागील वर्षी सिल्क रूट अल्ट्रा किंवा 24 तासांच्या आत 100 मैलांची शर्यत किंवा 14 तासांच्या आत 100 किमीची शर्यत पूर्ण केलेली असावी. मागील आवृत्तीत 14 तासांच्या आत खारदुंगला चॅलेंज पूर्ण करणारे धावपटू देखील पात्र आहेत. त्यांच्यासाठी किमान वयाची अट 24 वर्षे आहे.

खारदुंगला चॅलेंज समुद्रसपाटीपासून 13,090 फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला गावातून सुरू होते आणि लेहपर्यंत 72 किमी चालते. लडाख मॅरेथॉनच्या छत्राखालील या दोन अल्ट्रामॅरेथॉन सर्वात जास्त मागणी असलेल्या स्पर्धा आहेत. जगभरातील धावपटूंना आकर्षित करतात. यात जगातील काही सर्वात कठीण भूप्रदेशांचा सामना करावा लागतो. सिंधू नदी ओलांडताना काही नयनरम्य लँडस्केप पाहात धावण्याची संधी मिळते.

लडाख मॅरेथॉनसाठी हवामानाशी जुळवून घेणे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. इतकंच काय तर या स्पर्धेसाठी सहनशक्ती, इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. लडाखी खेळाडू आणि धावपटूंना हे सर्वात कमी आव्हानात्मक वाटते. कारण त्यांनी या हवामनाशी जुळवून घेतलं आहे. पण जगभरातील इतर भागातून येणाऱ्या स्पर्धकांनी आगाऊ तयारी करणे अत्यावश्यक आहे. लडाखमध्ये अल्ट्रामॅरेथॉन धावणे हे फक्त सर्वात अनुभवी आणि तंदुरुस्त व्यक्तींसाठी आहे.

मुंबईचे रहिवासी असलेले सतीश गुजरन (62) हे एक अनुभवी मॅरेथॉन स्पर्धक आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 90 किमीच्या कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये नियमित भाग घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेत अल्ट्रामॅरेथॉनच्या सलग 14 आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे. भारत, सिंगापूर, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन धावणारे गुजरन लडाख मॅरेथॉनला सर्वात कठीण मॅरेथॉनपैकी एक मानतात. क्षमतेच्या आणि अनुभवाच्या धावपटूसाठीही लडाख आव्हानात्मक आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळेच लांब पल्ल्याच्या स्पर्धेत भाग घेण्याआधी लडाखमधील हवामानाशी जुळवून घेण्याचे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, सतीश गुजरन यांनी उघड केले. “मी धावणे संपवले आणि रुग्णालयात दाखल झालो. कारण माझा एसपीओ लेव्हल खाली आला होता,” गुजरन यांनी लेहमध्ये लडाख मॅरेथॉनसाठी नोंदणीच्या वेळी टीव्ही 9 नेटवर्कशी बोलताना हा प्रसंग सांगितला. “या आणि इतर स्पर्धांची तुलना होऊ शकत नाही. कारण इथे, जर तुम्ही स्वतःला योग्यरित्या जुळवून घेतले नाही, तर तुमच्या जीवाला धोका ठरू शकतो. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल, तर तुम्ही शर्यतीसाठी नोंदणी करू नये.”, असा सल्लाही त्यांनी पुढे दिला.

गेल्या वर्षी लखनौमधील एका जोडप्याने एकत्रितपणे सिल्क रूट अल्ट्रा चॅलेंज स्वीकारले होते. त्यांनी 122 किमी धावण्याच्या शर्यतीत त्यांना आलेल्या आव्हानांचा खुलासा केला. या जोडप्यापैकी गृहिणी असलेली पत्नीच ही शर्यत पूर्ण करू शकली. कारण पतीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मध्येच धावणे सोडावे लागले. त्याच्या डाव्या पायाला अचानक स्नायूंचा अर्धांगवायू झाला.’बर्फ, थंडी, सूर्य आणि ऑक्सिजनची पातळी, लडाखमध्ये धावताना अनेक आव्हाने येतात,’ असे डॉ. कमल सिंग यांनी सांगितले. त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या पत्नीसोबत सिल्क रूट अल्ट्राचा प्रवास केला होता.
हायड्रेशन आणि वैद्यकीय सहाय्य
दोन्ही अल्ट्रामॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या सर्व सहभागींना सर्वोत्तम उपकरणे दिली जातात. यात जॅकेट, बीनी कॅप आणि लेअरिंगसाठी बॅग यांचा समावेश आहे. यामुळे स्पर्धकांना शर्यत पूर्ण करताना अडचणींवर मात करता येते. अशा आव्हानात्मक शर्यतींमध्ये हायड्रेशन आणि वैद्यकीय सहाय्य देशील महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत शक्य तितका सर्वोत्तम सहाय्य उपलब्ध करून देण्याची खात्री आयोजक करतात.
