She Paddle 2025 : आंतरराष्ट्रीय मास्टर्स वूमन्स टेबल टेनिस स्पर्धेदरम्यान ‘स्मॅश हर स्टोरी’चं प्रकाशन, पुस्तकात 32 राष्ट्रीय विजेत्या भारतीय खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासाचं वर्णन
International Masters Womens Table Tennis Tournament 2025 : भारतात पहिल्यांदाच शी पॅडल आंतरराष्ट्रीय मास्टर्स वूमन्स टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनेक दिग्गज महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. एकूण 3 दिवस या स्पर्धेचा थरार रंगला.

गोव्यात 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान शी पॅडल आंतरराष्ट्रीय मास्टर्स वूमन्स टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत टेबल टेनिसमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकूण 50 जणांनी सहभाग घेतला होता. यात रोमानियाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचाही समावेश होता. भारतात झालेल्या या पहिल्या स्पर्धेत स्नेहल भोले, शिवप्रिया नाईक आणि मंगल सराफ यांनी विविध वयोगटात चमकदार कामगिरी केली. स्नेहल भोले, शिवप्रिया नाईक आणि मंगल सराफ यांनी अनुक्रमे 40+, 50+ आणि 60+ वयोगटातील एकेरी विजेतेपद पटकावलं. तसेच या स्पर्धेदरम्यान “स्मॅश हर स्टोरी” पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं.
स्नेहल भोले यांनी 40+ इव्हेंटमध्ये मौसमी चॅटर्जी यांचा पराभव केला. तर शिवप्रिया नाईक यांनी 50+ एकेरी स्पर्धेत त्रुप्ती माचवे यांच्यावर मात केली. मंगल सराफ या भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी 60+ वयोगटातील स्पर्धेत मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियन मांटू मुर्मू यांचा पराभव केला. मौसमी चॅटर्जी, त्रुप्ती माचवे आणि मांटू मुर्मू या तिघींना उपविजेतपदावर समाधान मानावं लागलं.
तसेच गायत्री मोहन आणि स्वाती झुबे या दोघी 40+ वयोगटातील स्पर्धेत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी राहिल्या. नीता वैष्णव आणि दीपाली गोटाडके यांना 50+ वयोगटात संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तर रिता जैन आणि नीरु मेहता या दोघी 60+ वयोगटात तिसऱ्या स्थानी राहिल्या.
वूमन्स मास्टर्स डबल्समध्ये कुणाचा विजय?
वूमन्स मास्टर्स डबल्स इव्हेंटमध्ये स्नेहल भोले आणि गायत्री मोहन यांनी दीपाली गोटाडके आणि निता वैष्णव यांच्यावर मात करत किताब जिंकला. तर मंगल सराफ-रीता जैन आणि मांटू मुर्मू-मौसमी चटर्जी या 2 जोडींना संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं.
तसेच सांघिक स्पर्धेत मंगल सराफ यांनी त्यांच्या नेतृत्वात विजय मिळवून दिला. मंगल सराफ, सुकन्या, दीपाली गोटाडके आणि लक्ष्मी या संघाने अंतिम फेरीत मैदान मारलं. तर मांटू मुर्मू यांचं संघ उपविजेता ठरला. या उपविजेत्या संघात मुर्मू यांच्या व्यतिरिक्त कृष्णा, जयश्री, आणि स्वाती झुबे यांचा समावेश होता.
उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या संघातील खेळाडूंची नावं
इंदु शर्मा (कर्णधार), दीपा जैन, दिव्या आणि मनीषा जैन.
मनीषा प्रधान (कॅप्टन), गायत्री मोहन, हनीषा गोपानी आणि उज्वला.
‘स्मॅश हर स्टोरी’ पुस्तकाचं प्रकाशन
या स्पर्धेदरम्यान “स्मॅश हर स्टोरी” या पुस्तकाचं प्रकाशनही पार पडलं. शमिक चक्रवर्ती आणि दिलीप प्रेमचंद्रन यांनी हे पुस्तक लिहिलं. या दोघांना पुस्तकाच्या लिखाणात क्रीडा विश्वातील दिग्गज बोरिया मजुमदार यांचं मार्गदर्शन लाभलं. हे पुस्तक जी राजारामन यांनी घेतलेल्या मुलाखतींवर आधारित आहे. या पुस्तकात 1940 ते 2024 या कालावधीतील 32 राष्ट्रीय विजेत्या भारतीय महिला खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासाच वर्णन करण्यात आलं आहे.
मुनमून मुखर्जी काय म्हणाल्या?
“हे पुस्तक दशकांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिलेल्या महिला खेळाडूंना समर्पित आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून महिला खेळाडूंच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून भावी खेळाडूंना प्रेरीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, असं माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मुनमून मुखर्जी यांनी पुस्तक प्रकाशनादरम्यान म्हटलं. तसेच या कार्यक्रमाला जोशी टाकळकर या देखील उपस्थित होत्या. जोशी टाकळकर या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत. तसेच या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते. तसेच
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती?
कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कार विजेता आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता
पूजा बेदी, अभिनेत्री आणि वेलनेस कोच
माजी नॅशनल चॅम्पियन: शैलजा सालोखे आणि मोनालिसा बरूआ मेहता.
सुदीन वरेणकर, अध्यक्ष – गोवा टेबल टेनिस असोसिएशन
तसेच या कार्यक्रमाला अनेक माजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
