
PCB Chief Mohsin Naqvi Criticised : टीम इंडियाने पाकिस्तानचा केलेला सलग तिसरा पराभव आणि आशिया कप फायनलमध्ये ट्रॉफी देण्यावरून झालेल्या वादानंतर मोहसीन नकवी यांना प्रचंड लाजिरवाण्या अनुभवाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) चे विद्यमान अध्यक्ष असलेल्या नकवी यांना फक्त भारतासह जगभरातच नव्हे तर खुद्द त्यांच्याच देशातही अपमानाचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तान क्रिकेटच्या प्रमुखांवर आता त्यांच्याच देशात टीका होत आहे आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी सुरू झाली आहे.
रविवारी, 28 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा राग वाढला आहे. कर्णधार सलमान आगासह संघाच्या बहुतेक खेळाडूंवर त्यांच्या खराब कामगिरीबद्दल टीका झाली आहे, परंतु मोहसिन नकवी यांनाही रोषाचा सामना करावा लागच आहे. PCB आणि ACCचे अध्यक्ष असण्यासोबतच, नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये एका महत्त्वाच्या पदावर मंत्री आहेत आणि त्यामुळे इतर राजकीय पक्षांनीही बोर्डाच्या या वादग्रस्त अध्यक्षाविरुद्ध आघाडी उघडली आहे.
इमरान खानने मुनीरशी केली तुलना
पीटीआयच्या वृत्तानुसार, तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी मोहसीन नक्वी यांची तुलना पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी केली. “जे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे केले, तेच मोहसिन नक्वी पाकिस्तानी क्रिकेटचे करत आहेत.” असे माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान म्हणाले. मुनीरच्या नेतृत्वाखालीच भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याला मोठा पराभव आणि अपमान सहन करावा लागला. मुनीरच्या कार्यकाळात, पाकिस्तानी सैन्य आणि हवाई दलाचे असंख्य तळ उद्ध्वस्त झाले. अशीच परिस्थिती पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत घडत आहे, जो (संघ) प्रत्येक फॉरमॅट, स्पर्धा आणि पातळीवर पराभूत होत आहे.
पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त, हटवण्याची मागणी
त्याच वेळी, इम्रानच्या पक्षाच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) नेत्यांनी नकवी पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. जर हिंमत असेल तर ते पाकिस्तान क्रिकेटला उद्ध्वस्त करणाऱ्या मोहसिन नक्वी यांच्यावर कारवाई करतील असे आव्हान पक्षाचे नेते मुनीस इलाही यांनी सोशल मीडियावर ‘निर्वाचित’ पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिलं. नकवी यांची नियुक्ती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संरक्षक शाहबाज शरीफ यांनी केली होती. खराब कामगिरीच्या मालिकेनंतर ते आपले पद कायम ठेवू शकतात की त्यांना खुर्ची गमवावी लागते, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच.