वडील व्हेंटीलेटरवर, प्रत्येक सामना संपताच पार्थिव पटेलची रुग्णालयाकडे धाव

वडील व्हेंटीलेटरवर, प्रत्येक सामना संपताच पार्थिव पटेलची रुग्णालयाकडे धाव

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेव असा संघ आहे, ज्याला अजून एकही विजय साजरा करता आलेला नाही. या संघाच्या खेळाडूंमध्ये पहिलावहिला विजय मिळवण्यासाठी संघर्ष सुरु असला तरी सलामीवीर फलंदाज पार्थिव पटेल मात्र वेगळ्याच चिंतेत आहे. अनेक सामन्यांमध्ये अखेरपर्यंत लढणारा पार्थिव पटेल कौटुंबीक कारणांमुळे दुहेरी संघर्ष करत आहे.

पार्थिव पटेल त्याचा प्रत्येक सामना संपल्यानंतर थेट रुग्णालयाकडे धाव घेतो. पार्थिव पटेलचे वडील सध्या आजारी असून त्यांच्यावर अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुहेरी भूमिका निभावत पार्थिव त्याच्या संघासाठीही खेळत आहे. वडिलांची काळजी घेण्यासाठी त्याला रुग्णालयातही जावं लागतं. ब्रेन हॅमरेजमुळे वडिलांवर उपचार सुरु आहेत. पण दुसरीकडे पार्थिव पटेलला प्रत्येक सामन्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागतं.

फेब्रुवारीमध्ये पार्थिवच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याचं लक्ष सारखं कुटुंबीयांच्या फोनकडे असतं. फोनच्या माध्यमातूनच तो वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत असतो. पण सामना सुरु असताना पार्थिवला कुटुंबीयांकडून फोन केला जात नाही. जेव्हा कुटुंबीयांचा फोन घेतो, तेव्हा मनात प्रचंड भीती असते, असं पार्थिवने सांगितलं.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पार्थिव म्हणाला, “मी खेळत असतो तेव्हा माझ्या मनात काहीही नसतं. पण जसा सामना संपतो, तोच माझं सर्व लक्ष घराकडे लागतं. सकाळी उठताच वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करतो, डॉक्टरांशी बोलतो. कधी-कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात. आई आणि पत्नी सध्या घरी आहेत. पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्या मलाच विचारतात. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे होते. कारण, व्हेंटीलेटर बंद करावं, किंवा किती ऑक्सिजन द्यावा, हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात.”

यापुढे पार्थिवने सांगितलं, “सामन्याच्या दिवशी असं होतं, की कुटुंबाकडून निर्णय घेतला जातो आणि मग नंतर मला कळवतात. माझं लक्ष विचलित होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतात. मानसिकृष्ट्या प्रचंज तणाव आहे, पण कोण काय करु शकतं? अगोदर मनात प्रचंड वाईट विचार यायचे, पण आता कुटुंबाने स्वतःला सावरलं आहे.”

आरसीबीने पार्थिवला सामना संपल्यानंतर घरी जाण्याची  परवानगी दिलेली आहे. काही वृत्तांनुसार, प्रत्येक सामना संपल्यानंतर तो थेट घरी जातो आणि पुढच्या सामन्यापूर्वी परत येतो. सततच्या प्रवासामुळेही पार्थिव त्रास सहन करत आहे, पण खेळाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठीही तो मेहनत घेतोय. वडिलांच्या आजारपणामुळे त्याने सैय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटमधून माघार घेतली होती. पण कुटुंबाच्या आग्रहामुळे त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *