त्याने षटकार मारताच जल्लोष, मग मित्रांच्या काळजाचा चुकला ठोका; मैदानावरच खेळाडू कोसळला, अखेरच्या Video ने काळजात चर्रर

Batsman dies of Heart Attack : मृत्यूचा सांगावा कधी, कसा येईल हे सांगता येत नाही. अगदी हसत खेळत आपल्यासमोरील व्यक्ती डोळ्यादेखत झर्रकन निघून जाते यावर विश्वासच बसत नाही. पंजाबमधील फिरोजपूर येथील एका क्रिकेट मैदानावर अशीच एक घटना घडली आहे.

त्याने षटकार मारताच जल्लोष, मग मित्रांच्या काळजाचा चुकला ठोका; मैदानावरच खेळाडू कोसळला, अखेरच्या Video ने काळजात चर्रर
फलंदाजाचा मैदानावरच मृत्यू
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jun 29, 2025 | 2:13 PM

क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी धडकली आहे. येथे एका खेळाडूला मैदानातच हृदयविकाराचा झटका आला आणि काही कळण्याच्या आताच त्याने प्राण सोडला. आज 29 जून रोजी एका सामन्या दरम्यान या फलंदाजाने जोरदार षटकार ठोकला. त्यावेळी त्याचे सहकारी आणि मैदानातील लोकांनी टाळ्या वाजून जल्लोष केला. हा खेळाडू दोन पावले पुढे चालत जातो. दुसर्‍या बाजूकडील खेळाडू ही त्याच्या जवळ जातो. त्याचवेळी हा फलंदाज खाली बसतो आणि जमिनीवर पडतो. ही बाब लक्षात येताच सर्वच खेळाडू त्याच्याकडे धाव घेतात. त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. सर्वांनाच जबर धक्का बसतो. पंजाबमधील फिरोजपूर येथील गुरूहर सहाये भागातील डीएवी शाळेच्या मैदानावरील हे दृश्य तुमच्या मनाला चुटपूट लावून जाईल.

नेमके काय झाले?

आज रविवार, सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी स्थानिक मित्र गुरूहर सहाये भागातील डीएवी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळायला आले होते. हरजीत सिंह हे फलंदाजी करत होते. पांढरा आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट त्यांनी घातलेला होता. या सामन्यात त्यांनी एक शानदार षटकार ठोकला. उपस्थितांनी त्याला दाद दिली. सहकाऱ्याने जल्लोष केला. त्यानंतर हरजीत सिंह दोन पावले पुढे आले. त्याचवेळी त्यांचा नॉन स्ट्राईकवरील सहकारी विरुद्ध दिशेने आला. ते दोघे जवळ बसले. हरजीत सिंह क्रीजवर बसले आणि जागीच कलंडले.

अर्धशतक अपूर्णच राहिले

हे दृश्य पाहताच मैदानावरील अनेक खेळाडूंनी तिथे धाव घेतली. त्यांनी हरजीत सिंह यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काही खेळाडूंनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वाचवता आले नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे. या सामन्यात हरजीत यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी 49 धावा केल्या. त्यांचे अर्धशतक आता कधीच पूर्ण होणार नाही, अशा भावना रडत त्यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या.

मुंबईत पण अशीच घडली होती घटना

गेल्या वर्षी मुंबईत सुद्धा अशीच घटना जून महिन्यात घडली होती. फलंदाजाने षटकार चोपल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मुंबईतील कश्मीरा परिसरात बॉक्स क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एक तरूण जोरदार षटकार मारतो आणि लागलीच मैदानावर कोसळतो, हे दृश्य समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. देशात हृदयविकाराच्या घटना वाढत असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.