....म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!

....म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!

मुंबई : एम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा केली. 15 जणांच्या संघात मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू आणि युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांना स्थान मिळालं नाही. भारतीय संघात विकेटकीपर दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू विजय शंकर यांचा समावेश झाल्यानंतर त्यांची सर्वाधिक चर्चा सुरु आहे.

ऋषभ पंत आपल्या आक्रमक खेळीने कर्णधार विराट कोहलीच्या मर्जीतील खेळाडू बनला होता. त्याचा संघातील समावेशही जवळजवळ निश्चित मानला जात होता. मात्र तसे न होता, ऐनवेळी 33 वर्षीय दिनेश कार्तिकने दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी आपली जागा निश्चित करण्यात यश मिळवले. तो 21 वर्षीय पंतवर चांगलाच सरस ठरला.

दिनेश कार्तिकच्या निवडीत त्याचा अनुभव आणि यष्टीरक्षणातील त्याच्या विशेष तंत्राची भूमिका महत्त्वाची ठरली. दिनेश कार्तिकने 2004 मध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात केली होती. तेव्हा कार्तिक थोडीफार फलंदाजी करु शकणारा यष्टीरक्षक म्हणूनच संघात होता. मात्र, काही महिन्यांमध्ये (डिसेंबर 2004) महेंद्रसिंह धोनीने संघात आपले स्थान पक्के केले. त्यानंतर काही काळातच धोनी आपल्या फलंदाजीच्या विशेष शैलीने क्रिकेटविश्वात प्रसिद्ध झाला. त्याच्या तुलनेत दिनेश कार्तिकचे स्थान मात्र डळमळीत झाले. एककाळ सौरभ गांगुलीच्या मर्जीतील राहिलेल्या कार्तिकवर त्यानंतर संघाच्या आत- बाहेर येण्याची स्थिती तयार झाली.

इंग्लंडमध्ये दिनेश कार्तिकचा जलवा

भारताच्या संघातील स्थान डळमळीत होऊनही कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली शानदार कामगिरी सुरुच ठेवली. दरम्यान कार्तिकने आपल्या फलंदाजीच्या तंत्रावर विशेष लक्ष देत किरण मोरेंसोबत आपल्या यष्टीरक्षणावरही काम केले. 2006 मध्ये महेंद्रसिंह धोनीने विश्रांती घेतल्यानंतर कार्तिकचे भारतीय संघात पनरागमन झाले. मात्र, धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आल्याने कार्तिक पुन्हा दुर्लक्षित राहिला. यानंतर रिद्धिमान साहा आणि पार्थिव पटेलही संघाच्या आत-बाहेर होत राहिले. त्यामुळे दिनेश कार्तिकला अंतिम 11 मध्ये कायमस्वरुपी स्थान मिळवणे कठीण गेले. मात्र, विदेशी मैदानांवर जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा दिनेश कार्तिकने जोरदार फलंदाजी केली.

2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत याची झलक पाहायला मिळाली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि गांगुली यांनाही मागे टाकत दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. कार्तिकने 43 च्या सरासरीने 263 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवरील चेंडूच्या स्विंगची कार्तिकला चांगली माहिती आहे. याचा विचार करुन निवड समितीने पंत आणि कार्तिकवर चर्चा करताना 2007 ला शानदार खेळी करणाऱ्या कार्तिकला प्राधान्य दिले असावे. दिनेश कार्तिकने 91 सामन्यांमध्ये  1 हजार 738 धावा केल्या आहेत. दुसरीकडे ऋषभ पंतने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो फक्त 5 वन डे सामने खेळला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *