टीम इंडियासाठी ‘शुभ’वार्ता ! रोहित शर्माच्या जागी ‘या’ फलंदाजांना संधी

| Updated on: Feb 04, 2020 | 9:03 AM

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल, तर वनडे मालिकेत मयांक अगरवालला संधी देण्यात आली आहे

टीम इंडियासाठी शुभवार्ता ! रोहित शर्माच्या जागी या फलंदाजांना संधी
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा दुखापतग्रस्त सलामीवीर रोहित शर्माच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आता संपली (Rohit Sharma Replacement Found) आहे. कसोटी मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिलला संघात संधी देण्यात येणार आहे, तर वनडे मालिकेत मयांक अगरवालची वर्णी लागली आहे. रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. धवनपाठोपाठ ‘हिटमॅन’ही मालिकेतून ‘आऊट’ झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर वनडे मालिकेत रोहितच्या जागी मयांक अग्रवालची निवड झाल्याचं ‘बीसीसीआय’ने ट्वीट केलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहितच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे रोहित शर्माला मैदान सोडावं लागलं होतं. तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका रोहित खेळू शकणार नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना बुधवारी न्यूझीलंडच्या माउंट माउंगानुई मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. पाचव्या सामन्याच्या विजयात रोहित शर्माची कामगिरी महत्त्वाची ठरली.

रोहितने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्याने 41 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. मात्र, 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत रोहितच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रोहितला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठीही मैदानावर येऊ शकला नाही.

सामना जिंकल्यानंतर टीमसोबत ट्रॉफी घेण्यासाठी रोहित शर्मा आला तेव्हा त्याच्या पायाला पट्टी बांधली होती आणि दोन जणांच्या मदतीने तो चालताना दिसला.

रोहितच्या अगोदर भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर पृथ्वी शॉला वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.

टीम इंडियासाठी ‘शुभ’मन

आयपीएलमध्ये धमाका करणारा फलंदाज शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध कसोटी सामन्यात खेळताना शुभमनने पहिल्या डावात 83, तर दुसऱ्या डावात नाबाद 204 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीला चार षटकार आणि 22 चौकारांचा साज होता.

गेल्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये मयांक अगरवाल हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज मानला गेला होता. त्याने भारतासाठी सर्वाधिक धावाही केल्या होत्या. न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मयांक अगरवालने निराशाजनक कामगिरी केली होती. दोन्ही डावांमध्ये तो शून्यावर बाद झाला होता.

Rohit Sharma Replacement Found