Special Story | जेव्हा सचिन तेंडुलकर म्हणाला होता मी क्रिकेटर नव्हे अ‍ॅक्टर आहे

Special Story | जेव्हा सचिन तेंडुलकर म्हणाला होता मी क्रिकेटर नव्हे अ‍ॅक्टर आहे
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

आयकरात सूट मागणारी व्यक्ती लेखक, नाटककार, कलाकार, संगीतकार, अभिनेता किंवा खेळाडू आहे का? ज्या रक्कमेवर आयकरातून सूट मिळावी, अशी मागणी केली आहे, ती रक्कम वर नमूद केलेल्या व्यवसायांच्या माध्यमातून मिळाली आहे का? (Sachin Tendulkar tax dispute)

अनिश बेंद्रे

|

Feb 06, 2021 | 8:37 AM

मुंबई : शेतकरी आंदोलनावरुन सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादामुळे सध्या भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चांगलाच चर्चेत आहे. पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट करुन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली होती. तेव्हा सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रिटींनी हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारची पाठराखण केली होती. (Sachin Tendulkar tax dispute in 2011 I am actor not cricketer )

यानंतर सचिन तेंडुलकर याच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली होती. एकप्रकारे शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सचिनबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. या सगळ्यात सचिन तेंडुलकर याने आपला कर माफ व्हावा, यासाठी केलेल्या एका अजब युक्तिवादाचे प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

2011 साली सचिन तेंडुलकरला ईएसपीएन स्टार स्पोर्टस, पेप्सिको आणि व्हिसा या कंपन्यांच्या जाहिराती आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून जवळपास 5,92,31,211 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हे मानधन परकीय चलनात मिळाल्यामुळे सचिन तेंडुलकरने 80RR अंतर्गत आयकरात आपल्याला 1,77,69,363 इतक्या रक्कमेपर्यंत कर वजावट (Deducation), अशी मागणी केली होती.

सचिनच्या या मागणीमुळे दोन प्रमुख प्रश्न उपस्थित झाले होते. आयकरात सूट मागणारी व्यक्ती लेखक, नाटककार, कलाकार, संगीतकार, अभिनेता किंवा खेळाडू आहे का? ज्या रक्कमेवर आयकरातून सूट मिळावी, अशी मागणी केली आहे, ती रक्कम वर नमूद केलेल्या व्यवसायांच्या माध्यमातून मिळाली आहे का?, असा कायदेशीर पेच निर्माण झाला होता.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला होता?

त्यावेळी आयकर अपील न्यायाधिकरणाकडे आपली बाजू मांडताना सचिन तेंडुलकरने मी अभिनेता आणि मॉडेल असल्याचे सांगत आयकरातून सूट मिळण्यास पात्र असल्याचा दावा केला होता. मी केवळ अव्यावसायिक क्रिकेटर आहे. संबंधित कंपन्यांच्या लोगोच्या प्रमोशनसाठी किंवा क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मिळणारे पैसे हे मला संबंधित व्यवसायाचा अभिनय करण्यासाठी मिळाल्याचे सचिनने म्हटले होते. त्याचा समावेश उत्पन्नाच्चे इतर स्रोतांमध्ये होतो.

1997 पासून मला याच नियमानुसार आयकरात सूट मिळत आहे. त्यामुळे आतादेखील मी आयकरातून सूट मिळण्यास पात्र असल्याचे सचिनने सांगितले होते. मला अभिनेता नाही तर किमान कलाकार समजावे. कारण मी एक सार्वजनिक कलाकार (Public Performer) आहे, त्यामुळे मला कलाकाराची व्याख्या लागू होते, असा युक्तिवाद सचिन तेंडुलकरकडून करण्यात आला होता.

मात्र, या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी सचिनचा हा दावा फेटाळून लावला होता. तुम्ही क्रिकेट केवळ हौस किंवा छंद म्हणून खेळत नाही. तर तुम्हाला त्यासाठी पैसे मिळतात. क्रिकेटच्या खेळामुळेच तुमची उपजीविका चालते, त्यामुळे तोच तुमचा व्यवसाय असल्याचे मूल्यांकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते. (Sachin Tendulkar tax dispute)

तर कॉर्पोरेट आयकर विभागाकडूनही सचिनचा अभिनेता असल्याचा दावा फेटाळण्यात आला होता. जाहिरातींमध्ये तुमचा अभिनय अतिसामान्य दर्जाचा असला तरी त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. तुम्ही कलाकार आहात किंवा अभिनय येतो म्हणून तुम्हाला जाहिरातीमध्ये घेतलेले नव्हते, तुम्हाला केवळ जाहिरातीत दिसण्याचे (Appearing) पैसे मिळाले होते. त्यामुळे अभिनयाशी थेट संबंधित नसलेल्या दुय्यम कृतीसाठी 80RR कायद्यांतर्गत करमाफी देता येणार नाही, असे कॉर्पोरेट आयकर विभागाने नमूद केले होते.

… पण आयकर अपील न्यायाधिकरणाने निर्णय फिरवला

मूल्यांकन अधिकाऱ्यांनी सचिन तेंडुलकरचा दावा फेटाळल्यानंतरही वकिलांकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात आला. सचिनला जाहिरातींचे उत्पन्न क्रिकेटच्या कौशल्यामुळे मिळत असले तरी तो अभिनेताच आहे, त्याला 80RR अंतर्गत सूट मिळायलाच हवी, असे सचिनच्या वकिलांचे म्हणणे होते.

यावर विरोधी पक्षाच्या वकिलांनी सचिन तेंडुलकरला पुन्हा कोंडीत पकडले. करपात्र व्यक्तीला (सचिन तेंडुलकर) तो स्वत: क्रिकेटर, अभिनेता किंवा कलाकार यापैकी नक्की काय आहे, हेच माहिती नाही. या आयडेंडिटी क्रायसिसमुळे त्याला वरीलपैकी कोणत्याच प्रकारातंर्गत करातून सूट मिळू नये, असे सांगत वकिलांनी सचिन तेंडुलकरला पेचात पकडले होते.

मात्र, त्यानंतरही आयकर अपील न्यायाधिकरणाने सचिन हा अभिनेता असल्याचा निकाल दिला. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर असला तरी कॅमेऱ्यासमोर असताना त्याला एखाद्या अभिनेत्याप्रमाणेच स्वत:ची सर्जनशीलता, कल्पकता आणि कौशल्य वापरावे लागते. जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी त्याने अभिनयाचे कौशल्य विकसित केले आहे. त्यामुळे आम्ही सचिन अभिनेता असल्याचा निकाल देत आहोत. एकापेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये व्यावसायिक असण्याला कोणतेही बंधन नाही, असे आयकर अपील न्यायाधिकरणाने म्हटले होते. त्यामुळे सचिन तेंडुलकरला जवळपास पावणेदोन कोटींहून अधिक करकपात मिळाली होती.

(Sachin Tendulkar tax dispute in 2011 I am actor not cricketer )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें