
भारतीय बॅडमिंटनचे दोन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी जेव्हा लग्न केलं, तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला होता. या दोघांनी त्यांच्या दीर्घकाळाच्या मैत्रीला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचं लग्न झालं आणि सर्वकाही व्यवस्थित चाललं होतं. परंतु सायनाने जेव्हा अचानक घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. लग्नाच्या सात वर्षांनंतर पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला आणि त्यानंतर पुन्हा नात्याला एक संधी देण्याचं का ठरवलं, याविषयी आता सायना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
‘फिल्मीयाना’ला दिलेल्या मुलाखतीत सायना म्हणाली, “तो निर्णय आमच्यासाठी खूपच कठीण होता. अर्थातच ते सर्वकाही सोपं नव्हतं. कारण कधी कधी बॅडमिंटननंतर आम्हा दोघांच्या आवडी वेगळ्या वाटायच्या. दोघांची मानसिकता वेगळी असायची. त्यातच करिअरमधील बदलानुसार तणाव वाढला होता. पारुपल्लीच्या निवृत्तीनंतर जेव्हा तो प्रशिक्षक बनला, तेव्हा घरातील वातावरण खूप बदललं होतं.”
“हे साहजिकच होतं, कारण इतकी वर्षे फक्त बॅडमिंटन कोर्टवर घालवली होती आणि अचानक इतक्या वर्षांनंतर खेळ सोडून प्रशिक्षक बनला होता. कश्यप आता कोच आहे, तर आम्हाला वाटलं की कदाचित काहीतरी वेगळं सुरू होईल. परंतु आम्हाला एकमेकांच्या आवडीच विरुद्ध वाटू लागल्या होत्या. कदाचित हळूहळू सर्व ठीक होईल, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु वेळेनुसार तणाव आणखी वाढतच गेला. त्यामुळे आमच्यात भांडणं वाढत गेली. अशा परिस्थितीत आम्ही अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता”, असा खुलासा सायनाने केला.
घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्याच्या महिन्याभरानंतर सायना आणि पारुपल्ली कश्यप यांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला. ‘कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचं मूल्य शिकवतं. आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत’, असं लिहित सायनाने कश्यपसोबतचा फोटो पोस्ट केला होता. सायना आणि पारुपल्ली कश्यपने 14 डिसेंबर 2018 रोजी लग्न केलं होतं. त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात त्यांनी विभक्त होत असल्याचं म्हटलं होतं.
सायना नेहवाल ही भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने 2008 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर 38 वर्षीय पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची भेट 1997 मध्ये एका बॅडमिंटन कॅम्पमध्ये झाली होती. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये एकत्र प्रशिक्षण सुरू केलं होतं. तेव्हापासून दोघं एकमेकांना भेटू लागले होते.