अशी सुरू झालेली सायना नेहवाल-पारुपल्ली कश्यपची लव्ह-स्टोरी; बॅडमिंटन कपल अखेर विभक्त
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी याबद्दलची माहिती दिली. लग्नाच्या सात वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्तत झाली आहे. सायनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. लग्नाच्या सात वर्षांनंतर सायना आणि पारुपल्लीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात बॅडमिंटन कोर्टपासून सुरू झाली होती. दोघांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये एकत्र प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
सायना नेहवालची पोस्ट-
‘कधीकधी आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचार आणि संवादानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वत:साठी आणि एकमेकांसाठी शांती, आत्मविकास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनाला प्राधान्य देत आहोत. मी माझ्या आयुष्यातील क्षणांबद्दल कृतज्ञ आहे आणि कश्यपला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देते. कृपया यावेळी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या’, अशी पोस्ट सायनाने लिहिली आहे.

28 वर्षांपासूनची ओळख
सायना नेहवाल ही भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने 2008 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर 38 वर्षीय पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची भेट 1997 मध्ये एका बॅडमिंटन कॅम्पमध्ये झाली होती. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये एकत्र प्रशिक्षण सुरू केलं होतं. तेव्हापासून दोघं एकमेकांना भेटू लागले होते.
2004 मध्ये जेव्हा भारताचे मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी त्यांची बॅडमिंटन अकादमी सुरू केली. तेव्हा दोघांनी त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू केलं. याच सुमारास 2004 च्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी तयारी करत असताना दोघांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले होते.
सायनाने गेल्या वर्षाच्या अखेरीस निवृत्तीचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. जून 2023 मध्ये सिंगापूर ओपनमध्ये पहिल्या फेरीतच बाहेर पडल्यानंतर ती खेळली नाही. 35 वर्षीय सायनाने गेल्या वर्षाच्या अखेरीस गगन नारंगच्या ‘हाऊस ऑफ ग्लोरी’ या पॉडकास्टमध्ये संधीवाताच्या त्रासाबद्दल उघडपणे सांगितलं होतं. 2025 या वर्षाच्या अखेरीस निवृत्तीबाबत काय वाटतंय, याचं मूल्यांकन करणार असल्याचं तिने म्हटलं होतं.
