Sarfaraz Khan: ड्रेसिंग रुममधील माहिती लिक केल्याचा आरोप, गंभीरने थेट फोन केला अन्…सरफराज खानच्या खुलासाने खळबळ
Sarfaraz Khan On Gautam Gambhir: सरफराज खानवर ड्रेसिंग रुममधील माहिती लिक केल्याचा आरोप होत होता. आता यावर सरफराज खानने मोठा खुलासा केला आहे.

Sarfaraz Khan Interview: ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक झाल्याच्या आरोपांमुळे भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान खूप अस्वस्थ झाला होता. या आरोपांमुळे तो हादरला आणि खूप व्यथित झाला. या वादामुळे तो इतका अस्वस्थ झाला होता की तो प्रचंड तणावाखाली आला होता. ही घटना ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर घडली. सरफराजने आता खुलासा केला आहे की, त्या कठीण काळात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीच त्याला सर्वात आधी फोन केला होता. गंभीर यांनी त्याला अनावश्यक राजकारणापासून दूर राहून केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्याशी झालेल्या संभाषणात सरफराज खानने या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले. त्याच्या मते, ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक झाल्याच्या आरोपांमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. यानंतर त्याला फोन करणारी पहिली व्यक्ती गौतम गंभीर होते. गंभीर यांनी सरफराजला दोनदा फोन करून या गोष्टींकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला. सरफराज म्हणाला, “या वादानंतर मला माझा फोन बंद करावा लागला. त्यानंतर (गौतम) गंभीर सरांनी मला दोनदा फोन केला. हे सगळं मूर्खपणाचं आहे. या गोष्टी आणि राजकारणात पडू नकोस. तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर.”
Sarfaraz Khan opens up on the dressing room leaks controversy,🔥 https://t.co/zqU4fUmqmm
— Kashif (@KashifNdmCric) November 20, 2026
मी गंभीर यांना सांगितले की, “आरोपांमुळे माझे वडील खूप दुःखी झाले होते. माझी पत्नीसुद्धा रडत होती. यानंतर, गंभीरने सरफराज खानचे वडील, नौशाद खान यांच्याशीही संवाद साधला. सरफराजच्या म्हणण्यानुसार, गंभीर सर माझ्या वडिलांशी बोलले. त्यांनी मला अशा गोष्टींकडे जास्त लक्ष न देण्यास सांगितले. सरफराजला क्रिकेट खेळू द्या. तो एक चांगला क्रिकेटपटू आहे. गंभीरने त्याच्या वडिलांना असेही सांगितले की, जर त्यांना काही मदत लागली तर ते त्याला फोन करू शकतात.”
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान भारतीय ड्रेसिंग रूममधील तणावाच्या वृत्तांदरम्यान हा वाद निर्माण झाला. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर, मुख्य प्रशिक्षक गंभीर संघाच्या कामगिरीवर नाराज होते आणि त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर कठोर टीका केली होती, असे वृत्त समोर आले. यानंतर, ड्रेसिंग रूममधील माहिती लीक झाल्याबद्दल चर्चा सुरू झाली.
