शेन वॉर्नच्या मृत्यूचं गूढ कारण काय? मुलाच्या धक्कादायक दाव्याने खळबळ!

जगप्रसिद्ध महान फिरकीपटू शेन वॉर्नचा चार वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा त्याला कोणताही आजार नव्हता. तो अगदी धष्टपुष्ट होता. परंतु अचानक त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर संपूर्ण जगालाच धक्का बसला होता.

वॉर्नचा मृत्यू 2022 साली थायलँडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जाते. मृत्यूवेळी तो फक्त 52 वर्षांचा होता. दरम्यान, आता शेन वॉर्नच्या मृत्यूच्या साधारण चार वर्षांनी आता त्याच्या मुलाने समोर येत खळबळजनक दावा केल आहे.

शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सन याचा नुकताच एक पॉडकास्ट आला आहे. 'टू वर्ल्ड्स कोलाईड पॉडकास्ट' या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. माझ्या वडिलांना अगोदरपासूनच आरोग्याच्या काही समस्या होत्या, असे त्याने या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

तसेच कोरोनाची लस घेतल्यामुळे या सर्व समस्या आणखी समोर आल्या आणि त्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असावा. याबाबत जास्त विचार न करण्याचा मी प्रयत्न करतो. कारण असा विचार मनात आला की मला जास् राग येतो, अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.

मला वाटतंय की माझ्या वडिलांनी तीन ते चार वेळा कोरोनाची लस घेतली होती. कोरोनाची लस घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. परंतु त्यांच्या कामामुळे त्यांना ती घ्यावी लागली, असेही मत त्याने व्यक्त केले आहे. दरम्यान, आता शेन वॉर्न यांच्या मुलाने केलेल्या दाव्यांमुळे आता जागतिक पातळीवर वेगळी चर्चा रंगू शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.