Smriti Mandhana Wedding : मैत्रीण असावी तर अशी..लग्न टळल्यावर स्मृतीसाठी उभी राहिली खास दोस्त, जेमिमा रॉड्रिग्सचा मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार खेलाडू स्मृती मानधनाचा विवाह 23 नोव्हेंबरला होणार होता. मात्र आता ते लग्न पुढे ढकलण्यात आलं असून स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलबद्दल विविध चर्चा ऐकायला येत आहेत. त्याने स्मृतीची फसवणूक केल्याचेही बोलले जात आहे.या सर्व विवादामुळे स्मृतीचं खासगी आयुष्य प्रचंड चर्चेत सापडलं असून आता तिची खास मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्सने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सांगलीतील आलिशान घरात भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) तिच्या स्वप्नांच्या राजकुमारासोबत लग्नबंधनात अडकणार होती. 23 नोव्हेंबरला पलाश मुच्छलसोबत तिचा (Palash muchhal) विवाह होणार होता. मात्र त्याच दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि लग्न पुढे ढकलण्यात आलं. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र त्यानंतर ज्या एकेक बातम्या समोर येऊ लागल्या त्याने तर मोठी खळबळ माजली. स्मृतीचा होणारा पती , संगीतकार पलाश मुच्छल याने लग्नाच्या आदल्या दिवशीच स्मृतीची फसवणूक केली, तो एका कोरिओग्राफरसोबत सापडला,त्याने स्मृतीची फसवणूक केली अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. या सर्वांमुळेच स्मृतीचं खासगी आयुष्य अतिशय गदारोळात असून ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
यावर स्मृतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिच्या संघातील काही इतर सहकाऱ्यांनी पलाशला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने या सर्व चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे. त्यातच आता स्मृतीची खास मैत्रीण आणि टीम इंडियामधील नामवंत खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स उर्फ जेमिमा हिने मोठा निर्णय घेतला आहे. त्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
स्मृतीच्या पाठिशी उभी जेमी, घेतला मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात येणाऱ्या बिग बॅश लीगच्या ( WBBL) या सीझनमध्ये जेमिमा रॉड्रिग्स ही ब्रिस्बेन हीट टीममधून खेळणार होती. महिला वनडे वर्ल्डकप 2025 संपल्यानंतर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेमिमा तिथे पोहोचली होती. मात्र त्यानंतर 3 तारखेला स्मृतीचं लग्न होतं, तेच अटेंड करण्यासाठी जेमिमा मायदेशी परतली. लग्नानंतर ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार होती. मात्र 23 तारखेला घडलेला सर्व प्रकार, स्मृतीच्या लग्नाबद्दलच्या चर्चा, या सर्व गोंधळानंतर स्मृतीच्या कठीण काळात तिच्या पाठिशी उभी राहण्याचा निर्णय तिची खास मैत्रीण असलेल्या जेमिमाने घेतला. त्यामुळे आता (तिला) पुढच्या उर्वरित चार मॅचेससाठी परत बोलावू नये अशी विनंती जेमिमाने ब्रिस्बेन हीटच्या फ्रँचायजीकडे केली. त्यांनीही जेमिमाची ही मागणी मान्य केली.
ब्रिस्बेन हीटकडून निवेदन जारी
ब्रिस्बेन हीटचे सीईओ टेरी सेव्हनसन यांनी जेमिमा रॉड्रिग्ज हिच्यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. ‘ स्मृती मानधनाचे वडील अचानक आजारी पडल्यानंतर, जेमिमाने या कठीण काळात तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ती WBBL 2025 हंगामाच्या उर्वरित मॅचमध्ये सहभागी होणार नाही. आम्ही तिची सहभागी न होण्याची विनंती स्वीकारली आहे आणि आता ती भारतातच राहील. स्मृतीच्या वडिलांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना आम्ही करतो आणि तिच्या कुटुंबियांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. (मॅचसाठी) परत येऊ न शकल्याबद्दल जेमीने आम्हाला सांगितलं. ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल क्लब आणि हीट चाहत्यांचे तिने कौतुक केले’ असे त्यात नमूद करण्यात आलं आहे.
