
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ला दणक्यात सुरूवात झाली आहे. रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एक मोठा क्रिकेट सामना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पाचव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहेत. टीम इंडिया पहिला सामना जिंकून या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दणकून पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे ते दुसरा सामना जिंकण्याच्याच निर्धाराने ही मॅच खेळतील. मात्र या परिस्थितीत हा सामना पाकिस्तानी संघासाठीही कठीण असल्याचे बोलले जात आहे कारण सध्या संघाचा फॉर्म खूपच खराब आहे. पण काल झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जे प्रदर्शन केलं त्याची पुनरावृत्ती झाल्यास टीम इंडिया अडकू शकते आणि विजय मिळवणं कठीण होऊ शकतं.
गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पहिल्या सामन्यात 6 विकेटने पराभव केला होता. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करत बांगलादेशला 228 धावांवर रोखले आणि त्यानंतर 4 विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. त्यामध्ये शुबमनची शतकी खेळी महत्वाची ठरली. अशा परिस्थितीत भारताने मिळवलेला हा विजय खूप सोपा दिसला असला तरी या संपूर्ण सामन्यात जे काही दिसले ते पाहून चिंता वाढू शकते. टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला असाच खेळ केला तर पाकिस्तानवर मात करणे कठीण होईल.
खराब फिल्डींगचा फटका
या भीतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण, अर्थात फिल्डींग. टीम इंडियामध्ये अनेक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असले तरी पहिल्याच सामन्यात अगदी उलट चित्र पाहायला मिळाले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माचाही समावेश होता. या सामन्यात भारतीय संघाने दोन सोपे कॅच सुटले, ज्यात रोहितने पहिली चूक केली. अक्षर पटेलच्या चेंडूवर रोहितने झाकीर अलीचा थेट कॅच सोडला, त्यामुळे अक्षरची हॅटट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर झाकीरने पुन्हा शानदार खेळी केली.
एवढंच नव्हे तर रोहितपाठोपाठ हार्दिक पांड्यानेही सरळ आणि सोपा क2च सोडला, त्यानंतर तौहीद हृदयीने शानदार शतक झळकावले. या दोघांशिवाय यष्टिरक्षक केएल राहुलनेही अत्यंत साधे स्टंपिंग मिस केलं आणि संघाच्या अडचणी वाढवल्या. या चुकांची 23 तारखेच्या सामन्यात पुनरावृत्ती झाली तर पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये ते महागात पडू शकते.
मधल्या षटकांमध्ये निष्प्रभ गोलंदाज
कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकातच विकेट घेतली, तर पुढच्याच षटकात हर्षित राणानेही यश मिळवले. बांगलादेशच्या संघाने केवळ 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. मात्र असे असूनही झाकीर आणि तौहीद यांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची उत्कृष्ट भागीदारी केल्यामुळे बांगलादेशने एकूण 228 धावा केल्या. यानंतरही गोलंदाजांनी काही संधी दिल्या होत्या, पण त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांनी घेतला नाही. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये विकेट्स न मिळणे टीम इंडियासाठी पुढील दोन सामन्यांमध्ये खूप घातक ठरू शकते.
पहिले बॅटिंग करावी लागली तर…
बांगलादेशच्या 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागला, मात्र तरीही त्यांनी यश मिळवलंच. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अनेकदा विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरते. मात्र, दुबईत दव नसल्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अवघड ठरत आहे, याची काळजी आगामी सामन्यात घ्यावी लागणार आहे. पण टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे ते प्रथम फलंदाजी करण्याचे. सुरुवातीपासून संथ खेळपट्टीवर खेळणे आणि फिरकीपटूंना मिळणारी मदत हे त्यामागचे कारण आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना 9व्या षटकातच फिरकीपटू अक्षर पटेलने सलग 2 विकेट घेतल्या.
पहिल्या डावातही खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी उपयुक्त नाही हे यावरून स्पष्ट होतं. अशा स्थितीत टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तर पाकिस्तानी संघाचा फॉर्म खराब असला तरी त्यांना बचाव करणे सोपे जाणार नाही का?