बीसीसीआयचा पैशांचा पाऊस, 11 खेळाडूंना 60-60 लाखांचं बक्षीस!

  • Updated On - 4:43 pm, Fri, 5 July 19
बीसीसीआयचा पैशांचा पाऊस, 11 खेळाडूंना 60-60 लाखांचं बक्षीस!
भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच संपूर्ण टीमने या विजयाचे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले.

मुंबई: ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पैशांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका 2-1ने जिंकल्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने रोख रक्कम जाहीर केली आहे.  बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे खेळाडूंना इनाम रक्कम जाहीर केली.

त्यानुसार सर्व खेळाडूंना त्यांच्या मॅच फीनुसार बोनस मिळणार आहे. म्हणजेच प्रत्यक्ष मैदानात खेळणाऱ्या 11 खेळाडूंना प्रत्येक सामन्याला 15 लाख रुपये, तर राखीव खेळाडूंना 7.5 लाख रुपये प्रति मॅच असं बक्षीस जाहीर केलं. म्हणजेच 4 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला 15 लाख प्रति मॅचप्रमाणे 60 लाख रुपये मिळतील. तर राखीव खेळाडूंना 30 लाखांचं इनाम मिळेल.

प्रशिक्षकांनाही भरघोस इनाम

दुसरीकडे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही 25 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसंच सपोर्ट स्टाफलाही त्यांच्या पगारानुसार बोनस देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

बीसीसीआयचा कारभार सध्या सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या हातात आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघ

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, पार्थिव पटेल, रवीचंद्र अश्विन, रोहित शर्मा

भारताने इतिहास रचला

विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.

सिडनी कसोटीत 193 धावा ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलाच शिवाय मॅन ऑफ द सीरिजचा किताबही पुजारालाच मिळाला. पुजाराने चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह तब्बल 521 धावा ठोकल्या.

संबंधित बातम्या 

VIDEO : ‘मेरे देश की धरती’ गाण्यावर भारतीय संघाचा डान्स  

टीम इंडियाचं जगाने कौतुक केलं, आता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात…. 

स्वातंत्र्यानंतर पहिला विजय, भारताची ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात