U19 चे कर्णधार आता वनडे वर्ल्डकपसाठी भिडणार

भारत आणि न्युझीलंडमध्ये 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये मलेशियात झालेला सामना देखील विश्वचषकातील सेमीफायनलचाच होता. त्यावेळीही कोहली आणि विलियमसन हे दोघेच अनुक्रमे भारत आणि न्युझीलंड अंडर 19 संघाचे कर्णधार होते.

U19 चे कर्णधार आता वनडे वर्ल्डकपसाठी भिडणार

मुंबई : विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि न्युझीलंड उपांत्य फेरीत समोरासमोर आहेत. राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या सामन्यांमध्ये देखील भारत न्युझीलंडचा सामना होऊ शकला नव्हता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. असे असले तरी दोन्ही संघाचे कर्णधार विराट कोहली आणि केन विलियमसन मात्र 11 वर्षांपूर्वीच एकमेकांना भिडले होते. विशेष म्हणजे तो सामना देखील विश्वचषकातील सेमीफायनलचाच होता. मात्र, हा विश्वचषक होता अंडर 19 चा.

भारत आणि न्युझीलंडमध्ये 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये मलेशियात झालेला सामना देखील विश्वचषकातील सेमीफायनलचाच होता. त्यातील आणखी विशेष बाब म्हणजे कोहली आणि विलियमसन हे दोघेही त्यावेळी अनुक्रमे भारत आणि न्युझीलंड अंडर 19 संघाचे कर्णधार होते. त्यावेळी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात न्युझीलंडला नमवत फायनल  गाठली होती. फायनलमध्येही भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

इतिहासाची पुनरावृत्ती

यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. भारताचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वात तर न्युझीलंडचा संघ केन विलियमसनच्या नेतृत्त्वात खेळत आहेत. या दोन्ही संघांचा सेमीफायनलमध्ये सामना होत आहे. आता भारत पुन्हा न्युझीलंडचा पराभव करुन फायनलमध्ये जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सेमीफायनलच्या एक दिवस आधी विराटने पत्रकार परिषदेत म्हटले, “11 वर्षांनंतर आम्ही दोघे पुन्हा आपआपल्या देशाच्या संघांचे नेतृत्त्व करत आहोत. हे पाहून खूप छान वाटत आहे.”

सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामने डकवर्थ लुईस नियमानुसार

अंडर-19 विश्वचषक 2008 च्या सेमीफायनलमध्ये भारताने न्युझीलंडचा डकवर्थ लुईस नियमानुसार 3 विकेटने पराभव केला होता. न्युझीलंडने नाणेफेक जिंक प्रथम फलंदाजी घेतली आणि 50 षटकांमध्ये 8 विकेट गमावत 205 धावा केल्या होत्या. त्यावेळी सलामीवर केन विलियमसनने 37 धावांचे योगदान दिले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 43 षटकांमध्ये 191 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने 9 चेंडू बाकी असताना 7 विकेटच्या बदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला. या सामन्यात विराटने 43 धावांची खेळी केली होती.

या सामन्यात विराटने 2 विकेटही घेतल्या होत्या. त्याच्या अष्टपैलू खेळीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता. दुसरीकडे न्युझीलंडकडून टिम साउदीने 4 आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली होती. 11 वर्षांनंतर पुन्हा हे चारही खेळाडू खेळताना दिसू शकतात.

भारताने अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा देखील डकवर्थ लुईस नियमानुसार 12 धावांनी पराभव केला होता. याचप्रमाणे भारत पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले, असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला जातो आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *