Sanjay Manjrekar : चुका सुधारण्याऐवजी विराट कोहली…संजय मांजरेकर नको ते बोलले का? वादाला दिलं निमंत्रण
Sanjay Manjrekar : क्रिकेट समीक्षक संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीबद्दल एक स्टेटमेंट केलं आहे. यावरुन वाद होऊ शकतो. विराट कोहली सध्या फक्त वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियासाठी खेळतो. संजय मांजरेकर क्रिकेटशी संबंधित मुद्यांवर स्पष्टपणे मत मांडत असतात. आता त्यांनी विराटबद्दल मत प्रदर्शन केलय.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन फक्त वनडे क्रिकेट खेळण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ज्यो रुट आणि स्टीव्ह स्मिथ हे खेळाडू त्यांच्या टीमसाठी धावा करतायत. पण भारताचा कसोटी क्रिकेटमधील महान खेळाडू समस्येवर उपाय शोधण्याऐवजी सरळ कसोटीमधून निघून गेला, हे निराशाजनक आहे” असं संजय मांजरेकर म्हणाले. विराट कोहली 37 वर्षांचा आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजनंतर विराट कोहलीने टेस्ट मधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने 10 इनिंगमध्ये 194 धावा केल्या. यात पर्थ कसोटीतील 100 धावा होत्या. विराटच्या या निर्णयाने कसोटी क्रिकेटवर प्रेम करणारे तसेच त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
विराटने 123 कसोटी सामन्यात 46.85 च्या सरासरीने एकूण 9230 धावा केल्या. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या नाहीत. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी त्याच्या उद्दिष्ट्यांपैकी हे एक होतं. विराट अजूनही वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या राशी उभारतोय. पण टेस्टच्या जागी वनडे क्रिकेटला प्राधान्य देण्याचा विराटचा निर्णय संजय मांजरेकर यांना पटलेला नाही.
तो निघून गेला
“ज्यो रुट कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठत असताना माझ्या मनात विराट कोहलीचा विचार येतो. तो कसोटीमधून निघून गेला. निवृत्त होण्याच्या पाचवर्ष आधी विराटचा टेस्टमध्ये संघर्ष सुरु होता. पाच वर्ष टेस्टमध्ये त्याची सरासरी 31 का होती? या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी त्याने प्रयत्न केले नाहीत. तो निघून गेला. ज्यो रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलयमसन आज टेस्ट क्रिकेटमध्ये नाव कमावतायत” असं संजय मांजरेकर त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर म्हणाले.
त्याच्या बॅटमधून एक शतक निघालं नाही
“विराट कोहली सगळ्याच क्रिकेट फॉर्मेटपासून लांब गेला असता तर समजू शकतो. पण त्याने वनडे फॉर्मेटची निवड केली. माझ्यासाठी हे निराशाजनक आहे. कारण कुठल्याही टॉप ऑर्डर फलंदाजासाठी हा फॉर्मेट सोपा आहे. हे मी याआधी सुद्धा बोललोय” असं संजय मांजरेकर म्हणाले. 2025 ते 2025 ही पाच वर्ष विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष केला. हे लपून राहिलेलं नाही. कोविड-19 आधी विराटची सर्व फॉर्मेटमध्ये सरासरी 50 पार होती. पण तीन वर्षात त्याच्या बॅटमधून एक शतक निघालं नाही. ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो सहज बाद व्हायचा.
