संदीप देशपांडे पक्ष सोडणार? मनसेत मोठा भूकंप होणार? देशपांडे यांचं एका वाक्यात उत्तर काय?
संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर आता खुद्द संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे सोडण्याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले, ते सविस्तर वाचा..

निवृत्ती बाबर, मुंबई प्रतिनिधी: संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा मनसेच्याच नेत्यांनी सुरू केली आहे. म्हणजे संदीप देशपांडेंनीही पक्षातून जावं, अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुरू आहे. यासाठी ते अशी चर्चा घडवून आणत आहेत, असा दावा मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या संतोष धुरी यांनी केला होता. संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत घेतलं नाही. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही दिसले नाही पाहिजेत, असं वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं होतं, असंही संतोष धुरी म्हणाले होते. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे पक्ष सोडण्याच्या चर्चांवर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
“कालपासून माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत की संदीप देशपांडे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे काही गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी मनसेचं काम करत आहे. मनसेचंच काम मी नीट करत आहे आणि यापुढेही करत राहीन. माझी हात जोडून विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. महापालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय. संतोष धुरी काय म्हणाले, हे मला माहीत नाही. पण मी माझं काम करतोय”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “2012 मध्ये सर्वांना डावलून मला तिकिट दिलं, त्यावेळीसुद्धा अनेकजण इच्छुक होते. पण पक्षाने त्यावेळी मला संधी दिली. ठाकरे हा ब्रँड नाही तर ठाकरे हा विचार आहे. पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केली आहे. या प्रक्रियेत काही जागा मिळतात, काही नाही. आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत.”
मनसेमध्ये बाळा नांदगावकर बडवा आणि कटकारस्थानी आहे, असाही आरोप संतोष धुरींनी केला होता. त्यावर संदीप देशपांडे पुढे म्हणाले, “संतोष धुरी काय बोलत आहेत, यावर मला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्यांचा एक दृष्टीकोन असू शकतो. माझाही वेगळा दृष्टीकोन आहे. ते त्यांच्या दृष्टीकोनातून बोलतात आणि मी माझ्या दृष्टीकोनातून बोलतो. संतोष धुरी यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, आता हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर, हे येणारा काळच ठरवेल.”
