केएल राहुलच्या ‘त्या’ कृत्यामुळे आईने बोलणंच केलं होतं बंद; नेमकं काय घडलं?
KL Rahul Birthday: प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी किस्सा असतो, जे फार क्वचित लोकांना माहीत असतं. क्रिकेटर केएल राहुलच्या आयुष्यातही असाच एक किस्सा आहे. जेव्हा त्याला त्याची एक शौक महागात पडली होती. आईने त्याच्याशी अबोलाच धरला होता.

क्रिकेटर केएल राहुल सध्या आयपीएल 2025 मध्ये व्यस्त आहे. यंदा राहुल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने खेळतोय. नव्या सिझनमध्ये नव्या फ्रँचाइजीसाठी तो चांगलीच कामगिरी करताना दिसतोय. त्याच्या कामगिरीवर कुटुंबीयांनाही प्रचंड अभिमान आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा केएल राहुलच्या आईने त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा राहुल क्रिकेटविषयी शिकत होता. वयाच्या 15 व्या वर्षी राहुलने असं काम केलं होतं, ज्यामुळे त्याची आई त्याच्यावर फार चिडली होती. राहुलच्या या कृत्यामुळे त्याच्या आईने काही दिवस त्याच्याशी अबोला धरला होता.
केएल राहुलला लहानपणापासूनच खेळाची विशेष आवड होती. फक्त क्रिकेटच नाही तर तो विविध प्रकारचे खेळ खेळायचा. राहुलचे वडील केएन लोकेश आणि आई राजेश्वरी हे दोघं अकॅडमिक फिल्डशी जोडलेले आहेत. त्याचे वडील सुनील गावस्कर यांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे राहुलच्या क्रिकेट खेळण्याबद्दल त्यांना काहीच समस्या नव्हती. परंतु त्यांची एक अट होती. त्यांना राहुलला सक्त ताकिद दिली होती की त्याच्या खेळाचा परिणाम अभ्यासावर होता कामा नये. तर अभ्यासावर त्याचा फटका बसला तर राहुलला खेळ बंद करावा लागेल. त्यानेसुद्धा आईवडिलांची ही अट स्वीकारली आणि आपल्या आयुष्यात खेळासोबतच अभ्यासाचा समतोल साधला.




View this post on Instagram
जेव्हा मुलगा खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींमध्ये चांगला समतोल साधत असेल, तर मग कॉलेजमध्ये इतिहास शिकवणाऱ्या त्याच्या आईला कोणती समस्या असेल? परंतु वयाच्या 15 व्या वर्षी राहुलकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याची आई त्याच्यावर खूप रागावली होती. क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला आपला आदर्श मानणारा केएल राहुल लहानपणापासूनच वेगवेगळ्या स्टाइल्सचा खूप शौकीन होता. त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये जसा राहुल द्रविड हिरो होता, तसाच स्टाइलच्या बाबतीत इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेविड बेकहम हिरो होता.
केएल राहुलच्या शरीरावर तुम्हाला जे टॅटू पहायला मिळतात, ते डेविड बेकहमच्या क्रेझमुळेच आहेत. राहुलने वयाच्या 15 व्या वर्षीच शरीरावर टॅटू बनवण्यास सुरुवात केली होती. त्याच वयात त्याने घरात कोणालाच न सांगता पहिला टॅटू बनवला होता. ही गोष्ट जेव्हा त्याच्या आईला समजली, तेव्हा त्या त्याच्यावर खूप चिडल्या होत्या. राहुलवर त्या इतक्या नाराज झाल्या होत्या, की काही दिवसांकरिता त्यांनी त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं.