पाकिस्तानचा दारुण पराभव, विंडीजने फक्त 14 षटकात सामना जिंकला

नॉटिंगहम : विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना अवघ्या 105 धावांवर गारद झालेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव झाला. विजयासाठी 106 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अवघ्या 13.4 षटकात सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. फखर …

पाकिस्तानचा दारुण पराभव, विंडीजने फक्त 14 षटकात सामना जिंकला

नॉटिंगहम : विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना अवघ्या 105 धावांवर गारद झालेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव झाला. विजयासाठी 106 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अवघ्या 13.4 षटकात सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. फखर जमान (22) आणि बाबार आझम (22) यांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. वाहब रियाजने 18 धावा करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र विंडीजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. 21.4 षटकांमध्ये पाकिस्तानचा डाव 105 धावांवर आटोपला.

विंडीजचे ओशेन थॉमस आणि जेसन होल्डर पाकिस्तानसाठी सर्वात घातक गोलंदाज ठरले. थॉमसने 5.4 षटकात 27 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. तर होल्डरने 5 षटकात 42 धावा देऊन 3 फलंदाजांना माघारी धाडलं. आयपीएल गाजवणारा आंद्रे रसल गोलंदाजीतही चमकला. त्याने पाकिस्तानच्या 02 फलंदाजांना माघारी धाडलं.

अवघ्या 106 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विंडीजने अत्यंत सहजपणे हे लक्ष्य गाठलं. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सुरुवातीलाच आतषबाजी केली. 34 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि तो बाद झाला. यानंतर निकोलस पुरनने 34 धावा करत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *