इंग्लंडला ओव्हर थ्रोच्या 5 ऐवजी 6 धावा दिल्या, सर्वात मोठ्या अम्पायरकडून प्रश्नचिन्ह

आयसीसीच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. तर दुसरीकडे पूर्ण विश्वचषकात पंचांच्या खराब कामगिरीचा अनुभव आलाय. आयसीसीचे सर्वोत्कृष्ट पंच सायमन टफेल यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ज्या ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा दिल्या, त्या जागी फक्त 5 धावा होत्या, असं त्यांचं म्हणणं आहे.

इंग्लंडला ओव्हर थ्रोच्या 5 ऐवजी 6 धावा दिल्या, सर्वात मोठ्या अम्पायरकडून प्रश्नचिन्ह
सचिन पाटील

| Edited By:

Jul 15, 2019 | 6:36 PM

लंडन : विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरलं असलं तरी त्यावर निर्माण झालेला वाद सुरुच आहे. रविवारच्या थरारक सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. विशेष म्हणजे सुपर ओव्हरमध्येही समान धावा झाल्या आणि जास्त चौकार-षटकार लगावणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे आयसीसीच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. तर दुसरीकडे पूर्ण विश्वचषकात पंचांच्या खराब कामगिरीचा अनुभव आलाय. आयसीसीचे सर्वोत्कृष्ट पंच सायमन टफेल यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ज्या ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा दिल्या, त्या जागी फक्त 5 धावा होत्या, असं त्यांचं म्हणणं आहे.

न्यूझीलंडमधील वृत्तपत्र ‘द एज’शी बोलताना सायमन टफेल यांनी हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नियमानुसार या ठिकाणी पंचांकडून चूक झाली आहे. कारण, जिथे 5 धावा होत्या, तिथे 6 धावा देण्यात आल्या, असं ते म्हणाले. दरम्यान, या गोष्टीसाठी पूर्णपणे पंचांवर दोष देणं योग्य नाही, असंही सांगायला ते विसरले नाही.

त्यावेळची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. पंचांचं लक्ष फलंदाज कुठे पळतोय त्याकडे नाही, तर चेंडू कुठून कुठे जातोय त्याकडे होतं. पण टीव्ही रिप्लेमध्ये फलंदाज कुठे पळतोय त्याकडे लक्ष देण्यात आलं, असं त्यांनी स्पष्ट केलं. जगातील सर्वोत्कृष्ट पंचांपैकी एक म्हणून सायमन टफेल यांची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्यांनी निवृत्ती घेतली आहे. पण क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या आयसीसीच्या समितीचे ते सदस्य आहेत. सायमन टफेल यांना आयसीसीकडून दिला जाणारा अम्पायर ऑफ दी इयर हा पुरस्कार पाच वेळा मिळालाय.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

नियम क्रमांक 19.8 : यामध्ये ओव्हर थ्रो किंवा फिल्डरकडून जाणूनबुजून दिल्या जाणाऱ्या धावांची तरतूद आहे.

पेनल्टीची कोणतीही धाव दोन्ही संघांना दिली जाते.

थ्रो फेकण्याच्या वेळेपर्यंत फलंदाज धाव पूर्ण करण्यासाठी पळत असेल, तर ती धाव चौकार किंवा ओव्हर थ्रो म्हणून ग्राह्य धरली जाते.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ज्या चेंडूवर वाद निर्माण झालाय, तो इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या षटकातील चौथा चेंडू होता. या चेंडूवर बेन स्टोक्स फलंदाजी करत होता. स्टोक्सने फटकार मारला आणि तो धाव घेण्यासाठी धावला. पण त्याचवेळी मार्टिन गप्टिलने यष्टीरक्षकाकडे थ्रो फेकला, जो थेट बेन स्टोक्सच्या बॅटवर लागला. बेन स्टोक्सच्या बॅटवर लागून हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि इंग्लंडला 6 (4+2) धावा मिळाल्या. याच धावांमुळे नंतर इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करता आलं आणि सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या. पण सर्वाधिक चौकार-षटकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें