
क्रिकेटर युवराज सिंग हा त्याच्या पिढीतील सर्वांत प्रतिभाशाली खेळाडू मानला जातो. उत्कृष्ट कारकीर्द आणि त्यादरम्यान आलेल्या आरोग्याच्या समस्यांव्यतिरिक्त युवराजचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच खुल्या किताबाप्रमाणे राहिलंय. वडील योगराज सिंग यांच्याशी असलेलं त्याचं तणावपूर्ण नातं नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका मुलाखतीत युवराज त्याच्या आईवडिलांच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. त्यानेच त्याच्या पालकांना विभक्त होण्यास कसं भाग पाडलं, याबाबतचाही खुलासा युवराजने केला.
सिमी ग्रेवाल यांच्या मुलाखतीत युवराजला त्याच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “त्यांनी त्यांच्या खेळासाठी खूप मेहनत केली होती असं मी ऐकलंय आणि ते खूप प्रतिभावान होते. त्यांची खेळी आक्रमक होती आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या. त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यासाठीही कठीण होत्या. त्यांनी माझ्या माध्यमातून स्वत:ला पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि मी भारतासाठी खेळावं अशी त्यांची इच्छा होती.”
या मुलाखतीत युवराज सिंग त्याच्या वडिलांच्या कठीण प्रशिक्षण शैलीबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. “माझ्या वडिलांचे मित्र आणि कॉलनीतील लोक त्यांनी हिटलर म्हणायचे. मला अजूनही आठवतंय, आमच्याकडे खूप सुंदर बाग होती आणि आईने त्यात बरीच छोटी-मोठी झाडं लावली होती. परंतु वडिलांनी ते सर्व कापून तिथे थेट क्रिकेटचा नेट लावला होता. मी आदल्या दिवशीच्या अभ्यासाने इतका थकून जायचो की सकाळी लवकर उठायला नकार द्यायचो. तेव्हा ते एक बादलीभर थंड पाणी माझ्यावर ओतायचे. तेव्हा मला वडिलांचा खूप राग यायचा. अनेकांना असं वाटायचं की वडिलांच्या कठोर ट्रेनिंगमुळे एकेदिवशी माझा जीवच जाईल”, असं त्याने सांगितलं.
वडिलांची ट्रेनिंग जरी कठोर असली तरी त्या सर्व गोष्टींमुळेच यशस्वी खेळाडू बनल्याची कबुली त्याने दिली. तो पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की मी केलेल्या त्यागांमुळे आणि ज्या पद्धतीने मला ट्रेनिंग देण्यात आली, त्यामुळे मी इतक्या कमी वयात भारतासाठी खेळू शकलो. यात माझ्या आईचंही योगदान प्रचंड आहे. माझ्या आईने माझ्या संगोपनासाठी जे त्याग केले, ते केवळ एक आईच करू शकते, असं मला वाटतं. अशा आईचा मी खूप मोठा आभारी आहे.”
आपल्या आईवडिलांनी विभक्त व्हावं, हा विचार माझाच असल्याचीही कबुली युवराजने या मुलाखतीत दिली. लहानपणीच याची जाणीव झाली होती की माझे आई-वडील वेगवेगळे राहूनच खुश राहू शकतील, असं युवराज म्हणाला. याविषयी तो दोघांशी मोकळेपणे व्यक्थ झाला होता. “मी त्यावेळी 14-15 वर्षांचा होतो. जिथे आपले आई-वडील सतत भांडणं करत असतात, त्या वातावरणात राहणं खूप अवघड होतं. माझ्यासाठीही ते ठीक नव्हतं आणि त्यावेळी मी क्रिकेटमध्ये उतरलो होतो. सतत भांडून एकमेकांना दु:ख देण्यापेक्षा आणि मुलांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही विभक्त व्हा, असा सल्ला मी त्यांना दिला होता”, असं युवराजने सांगितलं. युवराज 17 वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तो आईसोबत राहू लागला आणि त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.