Yuvraj Singh retired : कधीही न विसरु शकणारे युवराजचे ‘ते’ सहा सिक्सर…

2007 च्या टी-20 विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यान युवराजने सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. युवराजची ती खेळी कदाचितच कुठला क्रिकेट प्रेमी विसरु शकतो.

Yuvraj Singh retired : कधीही न विसरु शकणारे युवराजचे 'ते' सहा सिक्सर...


मुंबई : भारतीय स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. मुंबईच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्याने ही निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी त्याच्या क्रिकेट प्रवासावर एक डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली. त्यानंतर युवराजने स्वत: तो क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी युवराजने त्याच्या क्रिकेट करिअरमधील सुवर्णकाळाचा उल्लेख केला. यामध्ये त्याने 2007 टी-20 आणि 2011 च्या विश्‍वचषकाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

युवराजचे ते सहा सिक्सर

2007 च्या टी-20 विश्वचषकात युवराजने धडाकेबाज कामगिरी केली होती. यादरम्यानच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराजने विक्रम रचला होता. याच सामन्यान युवराजने सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. युवराजची ती खेळी कदाचितच कुठला क्रिकेट प्रेमी विसरु शकतो.

2007 च्या टी-20 विश्वचषकमध्ये अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात पहिला ICC T-20 विश्वचषक जिंकला.

अंतिम सामन्यात इतिहास घडवण्यापूर्वी भारताच्या या स्वॉड-11 ने रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक संघाला अक्षरश: धूळ चारली. या दरम्यान 19 सप्टेंबर 2007 ला भारत आणि इंग्लंडमध्ये सामना रंगला होता. जेव्हा भारताने 16.4 षटकात 3 विकेट्स गमावून 155 धाव्या काढल्या होत्या, तेव्हा युवराज सिंह मैदानात उतरला.

सगळं ठीक चाललं होतं. सामना चुरशीचा सुरु होता. मात्र, तेव्हाच इंग्लडच्या फ्लिंटॉफने युवराजला चिडवलं. त्याने आपलं भान गमवावं म्हणून फ्लिंटॉफने युवराजला डिवचलं. फ्लिंटॉफच्या या वागणुकीचा युवराजला खूप राग आलेला होता. त्याला फ्लिंटॉफला उत्तर द्यायचं होतं आणि ते त्याने खेळातून दिलं. युवराजला राग अनावर झाला आणि त्याच्या रागाला स्टुअर्ट ब्रॉड बळी पडला.

क्रिकेटमध्ये नव्यानेच आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात म्हणजे 6 चेंडूत युवराजने 6 सिक्स ठोकले. स्टुअर्ट ब्रॉडने पहिला चेंडू टाकला तेव्हा युवराजने तो थेट सीमापार पोहोचवला. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि अखेर सहाव्या चेंडूवरही युवराजने सिक्सर ठोकून इतिहास रचला. फ्लिंटॉफ हे सर्व बघतच राहिला. या सामन्यानंतर युवराजला क्रिकेट विश्वात सिक्सर किंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या सामन्यात युवराजने 362.50 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूंमध्ये 58 धाव्या केल्या. यामध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

या जबरदस्त खेळीदरम्यान युवराजने केवळ 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. T-20 मध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक बनवण्याचा रेकॉर्ड आजही युवराजच्या नावे आहे. मात्र, आता युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आपला हा सिक्सर किंग कधीही आपल्याला त्या निळ्या जर्सीत खेळताना दिसणार नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI