
Social Media Influencers : सोशल मीडिया हळूहळू आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होत चालला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. प्रत्येक जण विविध सोशल मीडियावर सक्रीय आहे. रील्स, शॉर्ट, व्हिडिओ चाळणे आणि स्क्रोलिंग यात अनेकांचा फावला वेळ जात आहे. तर काहींना सोशल मीडियाशिवाय चैन पडत नसल्याचे दिसते. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर जणू काहींसाठी दैवत झाले आहेत. इन्फ्लुएन्सर जे सांगितील ते जणू दगडावरची रेष आहे. ते अंतिम सत्य आहे, असा अनेकांचा गोड गैरसमज झाला आहे. या सल्ल्याने अनेकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होत आहे. हे ओळखून चीनमध्ये या फुकटचा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरची वेसण आवळण्यात आले आहे. त्यांना मोठा झटका देण्यात आला आहे.
इन्फ्लूएन्सरना चीन सरकारचा दणका
चीनमध्ये सोशल मीडियावर लोक पडीक आहेत. या प्लॅटफॉर्मवर इन्फ्लुएन्सरचे भरमसाठ पीक आलेले आहे. हे इन्फ्लुएन्सर सतत फुकटचे सल्ले देत असतात. त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता डॉक्टर, वकील, औषधी, आर्थिक सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरला कम्युनिस्ट सरकारने दणका दिला आहे. असा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरकडे त्या विषयातील ज्ञान नसेल. त्याच्याकडे त्याविषयीची व्यावसायिक पदवी नसेल. तो त्या क्षेत्रातील माहितीगार नसेल तर त्याला सल्ला देता येणार नाही. अशा इन्फ्लुएन्सरला त्याची व्यावसायिक पदवी दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम 25 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू झाला आहे. आता कोणालाही या संबंधीत क्षेत्रात हिरोगिरी, चमकोगिरी करता येणार नाही.
चीनचा सोशल मीडिया
चीनमध्ये WeChat हे सर्वात लोकप्रिय सोशल मॅसेजिंग ॲप आहे. यावर 1.3 अब्ज मासिक युझर्स आहेत. या ॲपवर मॅसेजिंग,पेमेंट, मिनी-ॲप्स, सोशल नेटवर्किंग सर्वकाही आहे. याशिवाय चीनमध्ये टिकटॉकचे चीनी व्हर्जन Douyin हे लोकप्रिय आहे. या ॲपला शॉर्ट व्हिडिओचा किंग मानण्यात येते. या ॲपचे 700 दशलक्ष युझर्स आहेत. तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo हे पण लोकप्रिय आहे. हे भारतातील ट्विटरसारखे आहे. या प्लॅटफॉर्मचे 600 दशलक्षहून अधिक युझर्स आहेत.
द मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील Cyberspace Administration of China ने ही नियमावली तयार केली आहे. सोशल मीडियावरील भ्रामक माहिती, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला अटकाव करण्यासाठी हे पाऊल टाकल्याचे समोर आले आहे. आता जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्स आहेत. त्यांना जे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांची सत्यता, त्यांचे त्या क्षेत्रातील ज्ञान, वकूब आणि पदवी तपासणी करावी लागणार आहे. त्यांची माहिती योग्य आहे की नाही हे सुद्धा तपासण्याचे काम करावे लागणार आहे.
क्रिएटर्सला काय करावे लागणार?
क्रिएटर्सला आता स्पष्टपणे तो जी माहिती देणार आहे, त्याचा सखोल अभ्यास त्याने केलेला आहे, असे अगोदरच जाहीर करावे लागणार आहे. त्याच्याकडे तो जो विषय सांगत आहे, त्याविषयीचे ज्ञान आहे. त्याने पदवी मिळवलेली आहे. त्याला त्याविषयीची माहिती आहे हे त्याला अगोदरच जाहीर करावे लागणार आहे. त्याने AI चा वापर करून कंटेंट तयार केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे. माहितीपर कंटेंटच्या आधारावर एखाद्या कंपन्यांची जाहिरात करण्यावरही प्रतिबंध लावण्यात आला आहे.
भारतातही अशाच प्रकारच्या अटी आणि शर्तींचे गरज व्यक्त होत आहे. समाज माध्यमांवर उठसूठ कॉपी पेस्ट मजकूराआधारे अनेक इन्फ्लुएन्सर त्यांची चॅनल्स चालवत असल्याचा आरोप करण्यात येतो. काही इन्फ्लुएन्सर तर पक्षांची भाट झाली आहेत. काही जण तंत्र-मंत्राची चुकीची माहिती पसरवत आहे. तर काही जण वैद्यकीय सल्ले देऊन मोकळे होत आहेत. त्यांना अटकाव करण्याची मागणी होत आहे.