व्हॉट्सॲपसाठी आता पैसे मोजावे लागणार? लवकरच होणार मोठा बदल, किती असेल महिन्याचे शुल्क?

मेटा कंपनी व्हॉट्सॲप युजर्ससाठी 'व्हॉट्सॲप प्लस' हे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल लाँच करत आहे. यामध्ये १८ कस्टम थीम्स, २० चॅट्स पिन करण्याची सुविधा आणि नवीन आयकॉन्स मिळणार आहेत.

व्हॉट्सॲपसाठी आता पैसे मोजावे लागणार? लवकरच होणार मोठा बदल, किती असेल महिन्याचे शुल्क?
whatsapp plus
| Updated on: May 14, 2026 | 1:23 PM

सोशल मीडिया क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मेटा (Meta) कंपनीने जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप असलेल्या व्हॉट्सॲप युजर्ससाठी सर्वात मोठा बदल करण्याची तयारी केली आहे. व्हॉट्सॲप आता केवळ मेसेजिंग ॲप न राहता एक प्रीमियम अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच मेटा ‘व्हॉट्सॲप प्लस’ (WhatsApp Plus) नावाचे एक प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल लाँच करणार आहे. या नवीन प्लॅनमुळे युजर्सला चॅटिंगचा एक वेगळा आणि अधिक वैयक्तिक अनुभव मिळणार आहे. जागतिक स्तरावर हे नवीन मॉडेल लाँच केले जाणार आहे.

व्हॉट्सॲप प्लस नेमके काय?

व्हॉट्सॲप प्लस हे व्हॉट्सॲपचे एक सुधारित आणि सशुल्क व्हर्जन असेल. ही एक सबस्क्रिप्शन बेस्ड योजना असेल. ज्या वापरकर्त्यांना आपले व्हॉट्सॲप इतरांपेक्षा वेगळे दिसावे आणि ज्यांना अधिक तांत्रिक सोयी हव्या आहेत, त्यांच्यासाठी ही मॉडेल डिझाइन करण्यात आले आहे. ही सेवा व्हॉट्सॲप बिझनेससाठी नसून केवळ वैयक्तिक व्हॉट्सॲप मेसेंजर वापरणाऱ्यांसाठी देखील असणार आहे. तसेच सबस्क्रिप्शन न घेणाऱ्यांचे सामान्य व्हॉट्सॲप पूर्वीप्रमाणेच विनामूल्य सुरू राहील.

व्हॉट्सॲप प्लस ही एक मासिक शुल्क आकारली जाणारी सेवा असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्याप्रमाणे आपण नेटफ्लिक्स किंवा डिस्ने हॉटस्टारसाठी पैसे भरतो, तसेच व्हॉट्सॲपमधील काही एक्स्ट्रा फीचर्ससाठी आता पैसे मोजावे लागतील. मात्र, कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फिचर पूर्णपणे ऐच्छिक असेल. ज्यांना पैसे भरायचे नाहीत, त्यांचे नेहमीचे व्हॉट्सॲप मोफतच राहणार आहे.

प्रीमियम ग्राहकांना काय मिळणार?

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲप प्लस घेणाऱ्यांना खालील विशेष सुविधा मिळतील

  • कस्टम कलर थीम्स: आतापर्यंत आपण फक्त हिरव्या रंगाचे व्हॉट्सॲप वापरत होतो, पण आता १८ वेगवेगळ्या रंगांच्या थीम्स निवडता येतील.
  • २० चॅट्स पिन करण्याची सोय: सध्या फक्त ३ चॅट्स पिन करता येतात, पण प्रीमियम ग्राहकांना २० महत्त्वाचे संवाद सर्वात वर ठेवता येतील.
  • नवीन आयकॉन्स: फोनच्या होम स्क्रीनवर दिसणारा व्हॉट्सॲपचा लोगो बदलून १४ वेगवेगळ्या डिझाइन्सपैकी एक निवडता येईल.
  • खास रिंगटोन्स: कॉलसाठी १० नवीन युनिक रिंगटोन्स आणि विशेष ॲनिमेटेड स्टिकर्सचा संच यात दिला जाईल.

किंमत किती असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, युरोपमध्ये याची किंमत दरमहा सुमारे २७९ रुपये (२.४९ युरो) इतकी आहे. भारतात या प्लॅनची किंमत किती असेल, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु, ती साधारण २०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणाला मिळणार फायदा?

सध्या या फिचरची चाचणी काही निवडक अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांवर केली जात आहे. विशेषतः जे लोक कामासाठी व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच ज्यांना चॅटिंगचा अनुभव अधिक प्रोफेशनल हवा आहे, त्यांच्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Follow Us