माझ्या आयुष्याचं मीम..; HR सोबतचं अफेअर कॉन्सर्टमध्ये जगजाहीर होताच भडकला सीईओ

ॲस्ट्रोनॉमर या कंपनीचे माजी सीईओ अँडी बायरन हे जगप्रसिद्ध कोल्डप्ले बँडवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावरून त्यांच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप झाला होता.

माझ्या आयुष्याचं मीम..; HR सोबतचं अफेअर कॉन्सर्टमध्ये जगजाहीर होताच भडकला सीईओ
कोल्ड़प्ले बँडचे गायक आणि ॲस्ट्रोनॉमरचे माजी सीईओ अँडी बायरन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 27, 2025 | 3:13 PM

‘कोल्डप्ले’ या जगप्रसिद्ध बँडचा अमेरिकेत झालेला कॉन्सर्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता. यामागचं कारण म्हणजे, त्या कॉन्सर्टमधील व्हायरल झालेला एका व्हिडीओ. ‘किस कॅम’च्या माध्यमातून भर कॉन्सर्टमध्ये एका कंपनीच्या सीईओच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं पितळ उघडं पडलं होतं. ॲस्ट्रोनॉमर या कंपनीचे सीईओ अँडी बायरन हे एचआरसोबत कॉन्सर्टमध्ये अत्यंत रोमँटिक पोझमध्ये दिसले होते. जेव्हा कॅमेऱ्याने त्यांच्यावर फोकस केलं, तेव्हा दोघांनी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता. त्यावरून असंख्य मीम्स व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर या गोष्टीचा परिणाम म्हणून अँडी यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता याप्रकरणी ते कोल्डप्ले या बँडविरोधात कायदेशीर कारवाई घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘एनडीटीव्ही’नं दिलेल्या वृत्तानुसार, अँडी बायरन हे कोल्डप्ले बँड आणि कॉन्सर्टच्या आयोजकांवर त्यांच्या गोपनीयतेचं उल्लंघन केल्याबद्दल आणि त्यांना भावनिक त्रास दिल्याबद्दल कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. ‘पेज सिक्स’शी बोलताना अँडी यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं, “सार्वजनिकरित्या अपमानित होण्याची आणि त्यांचा व्हिडीओ शूट करण्याची त्यांनी सहमती दिली नव्हती. कोल्डप्लेनं त्यांच्या आयुष्याचं मीम बनवलंय. याबद्दल त्यांना खूप वाईट वाटलंय.”

बॉस्टनजवळ पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये अचानक त्यांच्यावर कॅमेरा फोकस करण्यात आला होता. त्यानंतर अँडी आणि क्रिस्टिन यांचं अफेअर अख्ख्या जगासमोर आलं होतं. या व्हिडीओमध्ये दोघं अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसले होते. ज्याक्षणी त्यांच्यावर कॅमेरा फोकस झाला, त्याक्षणी त्यांनी लगेच तोंड लपवण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान अनेकदा प्रेक्षकांवर कॅमेरा फोकस करण्यात येतो. बॉस्टनजवळील कॉन्सर्टमध्ये जेव्हा अँडी आणि क्रिस्टिन एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. कॉन्सर्टमधल्या कॅमेऱ्याने त्यांना टिपलं होतं आणि दोघं अचानक मोठ्या स्क्रीनवर झळकले. त्यांनी त्यांनी लगेचच तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन म्हणाला, “एकतर या दोघांचं अफेअर असेल किंवा ते कॅमेरापासून खूप लाजतायत.”