कुत्र्यांच्या भीतीने थेट घराच्या छतावर चढली गाय; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाईला छतावरून खाली कसं उतरवलं, त्याचाही व्हिडीओ शेअर करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे. एक गाय थेट घराच्या छतावर चढली.

भटक्या कुत्र्यांची समस्या अत्यंत गंभीर असून याबाबत अनेकदा तक्रारी केल्या जातात. काही ठिकाणी या भटक्या कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की केवळ माणसंच नाही तर इतर प्राणीही त्यांना घाबरू लागले आहेत. अशाच कुत्र्यांच्या भीतीने एक गाय थेट घराच्या छतावर चढली. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोराज मंडल इथल्या निराला गावात ही विचित्र घटना घडली. अशी घटना कदाचित याआधी तुम्ही पाहिली नसेल. गावातल्या भटक्या कुत्र्यांनी या गाईचा पाठलाग सुरू केला होता. तेव्हा स्वत:चा वाचवण्यासाठी ती थेट एका घराच्या छतावर चढली. नंतर या गाईला खाली उतरवण्यासाठी गावकऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली.
गाय छतावर चढल्यामुळे तिच्या वजनामुळे घराचं छत तुटण्याचीही भीती होती. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर गाईला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात गावकऱ्यांना यश मिळालं. सर्वसामान्यपणे जेव्हा कुत्रे एखाद्या प्राण्याचा पाठलाग करतात, तेव्हा ते त्यांचा सामना करतात किंवा कुठेतरी दूर पळून जातात किंवा सुरक्षित ठिकाणी लपतात. परंतु या गाईने जे केलं, ते सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारं होतं. ही गाय थेट इतक्या उंचीवर कशी चढू शकली, हाच मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. छतावर चढलेल्या या गाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
सर्वसामान्यपणे शेळ्या, कुत्रे, मांजरी कधीकधी झाडावर किंवा टेकड्यांवर चढतात. परंतु एका गाईने घराच्या छतावर चढणं ही खरंच आश्चर्यकारक बाब आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ती गाय खाली कशी आली, तिला छताखाली कसं आणलं गेलं, याविषयीचे प्रश्न काहींनी विचारले. तर गाईला खाली उतरवतानाही व्हिडीओ पोस्ट करण्याची मागणी काहींनी केली. काहींनी भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
याआधी मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दादर गावात अशीच विचित्र घटना घडली होती. मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्याने एक म्हैस घराच्या छतावर चढली होती. तिला खाली आणण्यासाठी तिथल्या लोकांना चक्क क्रेन आणावी लागली होती.
