घरातील 5 कष्टाची कामं बनतील सोपी, फक्त लिंबाच्या सालींचा अशा पद्धतीनं करा वापर
लिंबू हा फक्त स्वयंपाकासाठी नाही तर घराच्या स्वच्छतेसाठीही तितकाच उपयोगी आहे. त्याची साल फेकण्याऐवजी योग्य प्रकारे वापरल्यास अनेक कामं सहज पूर्ण करता येतात. हा एक सोप्पा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. पुढच्या वेळी लिंबू वापरल्यावर त्याची साल फेकण्याआधी याचा विचार नक्की करा!

स्वयंपाकासाठी लिंबाचा रस वापरल्यानंतर आपण त्याच्या साली फेकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या लिंबाच्या साली इतक्या उपयोगी आहेत की त्यांचा वापर केल्यास घरातील अनेक कष्टाची कामं एका झटक्यात सोपी होतात! लिंबाच्या सालींमध्ये नैसर्गिक सिट्रिक अॅसिड आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे स्वच्छतेसाठी आणि दुर्गंधी हटवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चला पाहूया लिंबाच्या सालींचा नेमका कसा उपयोग करता येतो.
फ्रिजमधील वास दूर करण्यासाठी
फ्रिजमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या गंधामुळे अनेकदा दुर्गंधी तयार होते. यासाठी लिंबाच्या साली एक छोट्या वाटीत बेकिंग सोडासह ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यास वास लवकर नाहीसा होतो. ही साल २-३ दिवसांनी बदलावी, जेणेकरून फ्रिजमध्ये ताजेपणा टिकून राहील.
किचन सिंकचा चिकटपणा हटवण्यासाठी
किचन सिंकमध्ये तेलकटपणा आणि अन्नकण साचल्यामुळे चिपचिप आणि वास येतो. लिंबाच्या साली बारीक चिरून ड्रेनच्या भोवती रगडा किंवा त्यात मीठ मिसळून स्क्रब केल्यास सिंक चमकदार आणि स्वच्छ होतो.
भांडी स्वच्छ ठेवण्यासाठी
बऱ्याच वेळा तेल, मसाले आणि अन्नाच्या अंशांमुळे भांड्यांवर चिकटपणा तयार होतो, जो साफ करणं कठीण जातं. अशावेळी लिंबाच्या साली उपयोगी ठरतात. त्या गरम पाण्यात टाकून भांडी त्यात काही वेळ भिजवा. याशिवाय लिंबाच्या साली थेट भांड्यांवर रगडल्यास किंवा बेकिंग सोडासोबत पेस्ट करून लावल्यास चिकटपणा सहज निघून जातो आणि भांडी चमकदार होतात.
तांब्याच्या भांडी स्वच्छ करण्यासाठी
तांब्याची भांडी वेळेअभावी काळीसर होतात. लिंबाच्या सालींमध्ये थोडं मीठ घालून त्या भांड्यांवर रगडा. किंवा त्या साली पाण्यात उकळून त्या पाण्याने भांडी धुवा. यामुळे भांड्यांची जुनी चमक परत येते. लिंबाच्या साली आणि व्हिनेगर यांचे मिश्रण देखील उपयुक्त ठरतं.
इतर काही उपयोग
1. मायक्रोवेव साफ करणे : लिंबाच्या साली पाण्यात उकळवून ते मिश्रण मायक्रोवेवमध्ये ठेवा आणि काही मिनिटांनंतर पुसून टाका. आतील दुर्गंधी आणि डाग सहज निघतात.
2. कॉफी मगवरील डाग काढणे : जुन्या कॉफी किंवा चहाचे डाग लिंबाच्या सालीने रगडून सहज काढता येतात.
3. हातांवरील गंध काढणे : कांदा, लसूण कापल्यानंतर हातांवर येणारा वास लिंबाच्या साली रगडून दूर करता येतो.
4. घरात सुगंध पसरवणे : लिंबाच्या कोरड्या साली एक कपड्याच्या पिशवीत भरून कपाट किंवा बाथरूममध्ये ठेवल्यास नैसर्गिक सुगंध राहतो.
5. कचऱ्याच्या डब्यातील वास घालवणे : कचऱ्याच्या डब्यात काही लिंबाच्या साली टाकल्यास दुर्गंधी कमी होते आणि ताजेपणा टिकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
