
रशियातील विनाशकारी भूकंपानंतर जपान आणि अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यांवर त्सुनामीचा गंभीर धोका असल्याचं म्हटलं गेलंय. हे लक्षात घेऊन संबंधित देशांनी किनारी भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. जेणेकरून वेळीच खबरदारी घेता येईल. परंतु तुम्हाला माहित आहे का, की भूकंप किंवा त्सुनामी येण्यापूर्वी प्राणी अस्वस्थ होतात. माणसांपूर्वी प्राण्यांनाच या नैसर्गिक आपत्तींची चाहूल कशी लागते, ते जाणवल्यानंतर त्यांच्या वागण्यात काय बदल घडतात, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..
माणसांपूर्वी अनेक प्राणी, पक्षी, सागरी प्राणी आणि कीटक यांना भूकंप आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची जाणीव होते. यामागचं कारण म्हणजे त्यांची इंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात. ध्वनी, कंपनं, विद्युत चुंबकीय लहरी यांना ते त्वरित प्रतिक्रिया देऊ शकतात. वैज्ञानिक संशोधन आणि ऐतिहासिक पुरावे ही बाब दर्शवतात की भूकंपाचे संकेत द्यायचे असल्यात प्राणी नेहमीपेक्षा वेगळे वागू लागतात. त्यांच्या वागणुकीत लगेच बदल स्पष्ट जाणवू लागतो.
भारत, जपान, चीन, इंडोनेशिया आणि इटलीसारख्या भूकंपप्रवण ठिकाणी अनेकदा भूकंप होण्यापूर्वी कुत्रे भुंकू लागले, पक्ष्यांचे मोठमोठे थवे त्यांच्या घरट्यांकडे परतू लागले आणि साप त्यांच्या बिळातून बाहेर पडल्याच्या नोंदी आहेत. 2004 च्या त्सुनामीपूर्वी इंडोनेशियाच्या अंदमान बेटांवर हत्ती उंच ठिकाणी पळून गेले होते. कारण त्यांना आधीच धोक्याची जाणीव झाली होती.
| प्राणी | वर्तनातील बदल |
| हत्ती | अचानक ओरडणे, कळपात धावणे |
| कुत्रे | भुंकणं, इथे-तिथे पळणं, भिंतीकडे पाहत राहणं |
| साप | थंडीतही बिळातून बाहेर येणं |
| मुंग्या | वारुळातून बाहेर येणं, वेगाने इथे-तिथे धावणं |
| पक्षी | पक्ष्यांचे मोठमोठे थवे आकाशात बेफामपणे उडणं |
| मासे | पृष्ठभागावर पोहणं |
प्राण्यांची इंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात, विशेषकरून त्यांची श्रवणाची इंद्रिये. भूकंप येण्याआधी पृथ्वीच्या कवचात निर्माण होणारी कमी तीव्रतेचे इन्फ्रासाऊंड आणि भूकंपाची कंपनं प्राण्यांना जाणवू शकतात. हे मानवांना जाणवू शकत नाही. काही प्राण्यांना विद्युत-चुंबकीय परिवर्तनसुद्धा जाणवतात.
आपदां पशवो गृह्णंति पूर्वं लक्षणतश्च वै. (गरुड़ पुराण, प्रेतखण्ड – अध्याय 16)
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, प्राणी आणि पक्षी हे आपत्ती येण्याआधीच त्याची लक्षणे ओळखतात. ऋषींनी असंही म्हटलंय की मानवांच्या आधी काही प्राण्यांना निसर्गातील बदल ओळखता येतात.
जपानमध्ये अनेक पाळीव कुत्रे आणि मांजरींना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 1975 मध्ये चीनमधील नानजिंग शहराने भूकंपापूर्वी प्राण्यांचं वर्तन पाहून संपूर्ण शहर रिकामं केलं होतं. त्यामुळे हजारो जीव वाचले होते.
एआय आणि सेन्सर आधारित तंत्रज्ञान आता प्राण्यांच्या वर्तनाचा मागोवा घेत आहेत. जर कुत्रा आणि पक्षी असामान्यपणे वागले, तर ही प्रणाली अलर्ट करू शकते. शास्त्रज्ञ त्याला Bio-Sensor Ecosystem म्हणतात. यामुळे निसर्ग, प्राणी आणि तंत्रज्ञान आपत्तीपूर्वी माहिती देण्यासाठी एकत्र काम करू शकतात.
याचं उत्तर आहे शंभर टक्के. कारण ही गोष्ट हजारो वर्षांपासून निसर्गात अस्तित्वात आहे. कधीकधी तंत्रज्ञानसुद्धा अपयशी ठरू शकतं, परंतु प्राण्यांच्या वर्तनाकडे विशेष लक्ष दिल्यास त्यातून बरेच संकेत मिळू शकतात.
भूकंप आणि त्सुनामीसारख्या आपत्तीपूर्वी प्राण्यांच्या वर्तनात झालेला हा बदल ही शास्त्र आणि विज्ञानाने सिद्ध केलेली वस्तुस्थिती आहे.
| प्राणी | वर्तनातील बदल | संभाव्य आपत्ती |
| हत्ती | उंचावर जाण्याची घाई | त्सुनामी |
| कुत्रे | अस्वस्थता, भुंकणं | भूकंप |
| साप | बिळातून बाहेर येणं | भूकंप |
| पक्षी | गोंधळल्याप्रमाणे दिशाहीन उडणं | वादळ/भूकंप |
| मुंगी | वारुळातून बाहेर येणं | पूर/भूकंप |
नैसर्गिक आपत्तींची चाहूल प्राण्यांना आधी लागते का? वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालंय का?
– होय, यूसी डेव्हिस (2011) आणि चीन भूकंप प्रशासन अभ्यास यांसारख्या अनेक संशोधनांनी या वस्तुस्थितीचं समर्थन केलं आहे.
फक्त कुत्रेच हे संकेत देऊ शकतात का?
– नाही. पक्षी, हत्ती, साप, मासे यांसारखे इतर अनेक प्राणीदेखील संकेत देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)