3 फ्लॅट, कोट्यवधींची संपत्ती, तरीही नशिबात वृद्धाश्रम, हैराण करणारी 82 वर्षीय वृद्धाची कहाणी
3 फ्लॅट, कोट्यवधींची संपत्तीच्या मालकाला मुलाने नाही तर, कोणी टाकलं वृद्धाश्रमात? आरोपीने 82 वर्षीय वृद्धाची फसवणूक केली, बँकेतून पैसे काढले आणि बरंच काही..., धक्कादयक घटना समोर

आपण अनेकदा पाहतो की मुलांचं शिक्षण झाल्यानंतर ते नोकरीसाठी परदेशात जातात अशात आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ मुलांवर येते. तर काही ठिकाणी आई – वडिलांची अडचण होत असल्यामुळे मुलं वृद्ध आई – वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. पण आता 82 वर्षीय निवृत्त आयआयटी प्राध्यापकाची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून त्यांना वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापकाची काळजी घेण्याच्या बहाण्याने, महिलेने त्यांची संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतली ज्यामध्ये तीन फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅट्स आणि इतर मालमत्तांची एकूण किंमत 6 कोटी रुपये असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त आयआयटी प्राध्यापकांचा मुलगा जेव्हा मुंबईत वडिलांना भेटण्यासाठी आला, तेव्हा धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. मुंबईत घरी आल्यानंतर मुलाला वडील घरी नसल्याचं समोर आलं. जेव्हा मुलाला कळलं की, देखरेख करणाऱ्या महिलेने वडिलांना फेब्रुवारी 2025 मध्ये विक्रोळी येथील वृद्धश्रमात ठेवलं आहे. तेव्हा मुलगा पुन्हा वडिलांना घेवून घरी आला आणि पोलिसांशी संपर्क साधला.
निवृत्त प्राध्यापकाच्या तक्रारीच्या आधारे, 8 जून रोजी देखरेख करणारी महिला निकिता नााईक हिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, निवृत्त प्राध्यापक पवईतील हिरानंदानी गार्डनमधील ‘ग्लेन हाइट्स अपार्टमेंट’मधील एका फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. 2017 मध्ये, जेव्हा निवृत्त प्राध्यापक योगाभ्यास करण्यासाठी बागेत येत असत, तेव्हा त्यांची त्या महिलेशी भेट झाली. त्यानंतर, ती त्यांच्या फ्लॅटला वारंवार येऊ लागली आणि त्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या दैनंदिन कामात मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत ‘केअरटेकर’ म्हणून राहू लागली.
एवढंच नाही तर, निवृत्त प्राध्यापक यांची दृष्टी कमी झाल्यानंतर त्यांना फोनमधील व्यवहार देखील स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा महिलेने त्यांचे बँकिंग तपशील आणि त्याचे सर्व एटीएम कार्ड ताब्यात घेतले आणि त्यांच्या वतीने सर्व आर्थिक व्यवहार करू लागली.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, मदतीच्या बहाण्याने महिलेने निवृत्त प्राध्यापकांना नोंदणी कार्यालयात नेलं आणि त्यांच्या नकळत कागदपत्रांवर सही करण्यास सांगितलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी महिलेने त्याच्या मालमत्तेचा एक तृतीयांश भाग गिफ्ट डीडच्या स्वरूपात स्वतःच्या नावावर हस्तांतरित केला.
शिवाय सोन्याचे दागिने, सही केलेले चेक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आणि महत्त्वपूर्ण कागदपत्र स्वतःच्या ताब्यात घेतेले आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे कृत्य तेव्हा उघडकीस आले जेव्हा सोसायटीने वृद्ध निवृत्त प्राध्यापकांच्या मुलाला महिलेच्या नावाने शेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी अर्ज मिळाल्याची माहिती दिली. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.
