
शादी का लड्डू… जो खाए पछताए , जो ना खाए वो ललचाए.. ही म्हण तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. बहुतांश लोकं हे आयुष्यात एकदात लग्न करतात, पण काही माणसं अशीही असतात जी एकापेक्षा जास्त वेळा लग्न करतात, कोणी 2 तर कोणी 3 वेळा. पण छत्तीसगडमधला एक इसम तर असा आहे, जो 2-3 वेळा नव्हे तर तब्बल 10 वेळा बोहोल्यावर चढला. हो, हो, हे खरं आहे, त्याने तब्बल 10 वेळा लग्न केलं. पण हे झालं कसं हाच मोठा प्रश्न आहे. हा अजब-गजब मामला नक्की आहे तरी काय ? चला जाणून घेऊया..
खरंतर, धुला राम नावाचा हा माणूस छत्तीसगडच्या जशपूरच्या सुलेसा गावचा रहिवासी आहे. आयुष्यात स्थिर व्हावं, संसार करावा या इच्छेपायी त्याने गेल्या 10 वर्षांत 9 लग्न केली, तब्बल 9, पण त्याचा एकीशीही संसार नीट टिकला नाही. दरवेळी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामागचं कारण म्हणजे तो त्याच्या पत्नीवर संशय घ्यायचा, तिला मारहाण करायचा. आणि त्याच्या याच वृत्तीमुळे त्याचं कोणतंही लग्न 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकलं नाही, अशा प्रकारे 9 पत्नी त्याला सोडून गेल्या.
मात्र अखेर तो दिवस उगवलाच, त्याच्या आयुष्यात जेव्हा 10 वी पत्नी आली. धुला राम हा 10 व्यांदा वर बनून बोहोल्यावर चढला. पण 10 व्या लग्नं झाल्यावर त्याने त्या पत्नीसोबत जे केलं, ते जाणून घेतल्यावर तुम्हीही अवाक व्हाल.
10 व्या पत्नीला थेट…
खरंतर झालं असं की लग्न झाल्यानंतर धुलाराम आणि त्याची पत्नी एका लग्नासाछी गेले होते. मात्र आपल्या पत्नीने त्याच लग्नाच्या ठिकाणाहून थोडे तांदूळ, तेल आणि एक साडी चोरली असा संशय धुलामारला आला. त्यानंतर याच मुद्यावरून पती-पत्नी मध्ये भांडण झालं, बघता बघात वाद चांगलाच पेटला. आणि रागाच्या भरात धुलारामने त्याच्या 10 व्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिची थेट हत्याच केली. या वर्षी एप्रिलमध्ये त्याने हे घृणास्पद कृत्य केलं.
असा उघड झाला गुन्हा
त्यानंतर, आपला गुन्हा लपवण्यासाठी, धुलारामने 10 व्या पत्नीचा मृतदेह जंगलात वाळलेल्या पानांमध्ये लपवून ठेवला. सुमारे 4 दिवस तो मृतदेह जंगलात कुजत राहिला आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली. स्थानिकांना हे कळताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धुलारामची कसून चौकशी केल्यावर आपणच पत्नीला मारल्याचे सांगत त्याने आपला गुन्हा कबूल केला.